Thu, Apr 18, 2019 16:08होमपेज › Pune › देहूरोड हद्दीत ‘डीजे’चा दणदणाट कायम

देहूरोड हद्दीत ‘डीजे’चा दणदणाट कायम

Published On: May 12 2018 1:31AM | Last Updated: May 11 2018 11:02PMदेहूरोड : उमेश ओव्हाळ

ध्वनिप्रदूषणाचा वाढता धोका पाहता दिवसा व रात्री आवाजाच्या मर्यादा घालून देण्यात आल्या आहेत. ध्वनी मर्यादेनंतर अर्थातच डीजेवर संक्रांत आली. राज्यात सर्वदूर डीजे बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात आली. असे असले तरी देहूरोड परिसरात हे आदेश लागु आहेत की नाही, असा प्रश्‍न पडावा, असेच वातावरण पहावयास मिळत आहे. शहराच्या विविध भागात सर्रासपणे रात्री उशीरापर्यंत डीजेचा धांगडधिंगा जणू आम बात झाला आहे.ध्वनीप्रदूषणाबाबत कडक धोरण अंमलात आल्यानंतर राज्यात याबाबतच्या कायद्याची कडक अंमलबजावणी सुरू झाली. त्याचा सर्वाधिक फटका डॉल्बी डिजिटल साऊंड सिस्टिमच्या व्यवसायाला बसला. पोलिसांनी डीजेला थेट बंदीच घातली. सुरुवातीच्या काळात या निर्णयाला विरोध झाला. 

काही ठिकाणी आंदोलनेही झाली. पण पोलीसांपुढे व्यवसायिकांना झुकावे लागले. डोक्याला ताप नको या विचाराने अनेकांनी आपले डीजे विकुन टाकले. याचा फायदा साहजिकच काही शहरात बोटावर मोजण्याइतक्या संख्येने उरलेल्या डीजे मालकांनी घेतला. पोलीसांशी हातमिळवणी करून डीजेचा दणदणाट सुरू ठेवण्यात हि मंडळी यशस्वी होताना दिसत आहेत.  डीजेबंदीनंतर या व्यवसायाचे स्वरूपच बदलले आहे. पुर्वी तासावर भाडे घेतले जात असे. माष, सध्या रात्री किती वाजेपर्यंत डीजे वाजवायचा हे विचारून सुपारी ठरविली जाते. अर्थातच पोलीस कारवाईची जबाबदारी डीजेमालकच घेतात. अशावेळी एखाद्याने तक्रार केलीच तर कारवाईसाठी आलेल्या पोलीसांशी चर्चा करून प्रकरण मिटवले जाते. तात्पुरता डीजे बंद केला जातो, पण पोलीसांची पाठ फिरताच पुन्हा गोंगाट सुरू केला जातो. अशा प्रकारांमुळे आता डीजेची तक्रार देण्यासही नागरिक धजावत नाहीत.

रात्रीउशीरा व पहाटेपर्यंत वाजणार्‍या डीजेमुळे नागरिकांची झोपमोड होते. शिवाय लहान बालके, नवजात शिशु, वयोवृध्द नागरिक तसेच रुग्णांना भयंकर त्रास सहन करावा लगत असल्याचे समोर आले आहे. सक्त ताकीद असूनही याबाबत डीजेमालक, संबंधित यजमान किंवा पोलसि यापैकी कुणीही गंभीर्याने विचार करताना दिसत नाही. डीजेच्या रूपाने एक सामाजिक विकृतीच वस्त्यावस्त्यांधून प्रदूषणाचे पाश आवळताना दिसत आहे.

अधिकारी कडक; मग डीजे वाजतातच कसे?

कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील हे कडक शिस्तीचे अधिकारी आहेत. त्यातच पुणे जिल्ह्यालाही सुवेझ हक यांच्यासारखा कडक अधिकारी लाभला आहे. डीजेबंदीबाबत दोन्ही अधिकारी गंभीर आहेत. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत डीजे वाजल्याची तक्रार येईल, त्या अधिकार्‍यावर कारवाई केली जाईल, अशी ताकीदच हक यांनी दिली होती. असे असूनही डीजेचा दणदणाट पचविण्याचे धैर्य स्थानिक पोलीस अधिकारी दाखवताहेत.