Sun, Jul 21, 2019 10:07होमपेज › Pune › अंधश्रद्धेला खतपाणी; डॉक्टरला अटक

अंधश्रद्धेला खतपाणी; डॉक्टरला अटक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात रुग्णावर उतारा करून अंधश्रध्देला खतपाणी घालणार्‍या डॉक्टरला अलंकार पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. त्याला 2 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. 

डॉ. सतीश शाहुराव चव्हाण (वय 45, रा. शुक्रवार पेठ) असे पोलिस कोठडी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणात उतारा करणारा मांत्रिक सचिन सदाशिव येरवडेकर (वय 48, रा. 306, कसबा पेठ) याला यापूर्वीच अटक केली. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. संध्या गणेश सोनवणे असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचा भाऊ महेश विष्णू जगताप (वय 22, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ही घटना 20 फेब्रुवारी ते 11 मार्च 2018 या कालावधीत स्वारगेट येथील चव्हाण नर्सिंग होम आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडली. सोनवणे यांच्या छातीमधील दुधाच्या गाठी काढण्याचे ऑपरेशन डॉ. सतीश चव्हाण याच्या चव्हाण नर्सिंग होममध्ये करण्यात आले होते. हे ऑपरेशन करताना मोठा रक्तस्राव झाला होता. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, त्यापूर्वी सोनवणे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात असताना सकाळी 7 ते 8.30 ही वेळ यमाची घंटा आहे, असे सांगून त्यांच्या कुटुंबीयांना ऑपरेशन करण्यापासून परावृत्त करण्यात आले. बरे होण्यासाठी सोनवणे यांना मंत्रपठण करण्यास सांगितले. मांत्रिकास बोलावून त्यांचा उतारा केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 

डॉ. चव्हाण याला अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे. मृत सोनवणे यांच्यावर नोव्हेंबर 2017 मध्ये पहिले, डिसेंबर 2017 मध्ये दुसरे आणि 20 फेब्रुवारी 2018 रोजी तिसरे अशी ऑपरेशन डॉ. चव्हाण याच्या नर्सिंग होममध्ये झाली होती. तिसर्‍या वेळी मोठा रक्तस्राव झाल्याने त्यांना उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दीनानाथ येथे केलेल्या उपचाराची कागदपत्रे प्राप्त झालेली असून, चव्हाण याने रुग्णावर केलेल्या उपचाराची कागदपत्रे जप्त करायची आहेत. सोनवणे यांचा मृत्यू निष्काळजीपणामुळे झाला आहे का, त्यांच्या मृत्यूस कोण जबाबदार आहे, उपचाराच्या वेळी डॉक्टरसोबत कोण नर्स अथवा कर्मचारी होते. याचा तपास करण्यासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सहाय्यक सरकारी वकील संध्या काळे यांनी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.

Tags : Pune, Pune News, doctor, supports, Superstition


  •