Thu, Jun 27, 2019 16:10होमपेज › Pune › बालगंधर्व रंगमंदिर पाडायला नकोच!

बालगंधर्व रंगमंदिर पाडायला नकोच!

Published On: Jun 28 2018 1:34AM | Last Updated: Jun 28 2018 12:16AMपुणे : प्रतिनिधी

राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहराची बालगंधर्व रंगमंदिर ही ओळख आहे. याठिकाणी कला सादर करणार्‍या कलाकारासाठी हे भूषण आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली रंगमंदिर पाडण्यापेक्षा त्याच्या आजूबाजूच्या जागेचा विकास व्हावा. शहरातील अन्य जागी भव्यदिव्य रंगमंदिराची उभारणी करून बालगंधर्व रंगमंदिर हे सांस्कृतिक केंद्र होण्याच्या दृष्टीने महापालिकेकडून प्रयत्न व्हावा, असा सूर बालगंधर्व रंगमंदिर : पुनर्विकास की पूर्णविराम या चर्चासत्रात पुन्हा एकदा उमटला. 

निमित्त होते बालगंधर्व रंगमंदिर सुवर्ण महोत्सवी वर्ष 2018 च्या सांगता सोहळ्याचे. याप्रसंगी पार पडलेल्या चर्चासत्रात खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण, माजी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, डॉ. सतीश देसाई, सुनिल महाजन, मोहन कुलकर्णी उपस्थित होते. अ‍ॅड. चव्हाण म्हणाल्या, महापालिकेच्या कोणत्याही प्रोजेक्टचे ट्रॅक रेकॉर्ड बरोबर नाही. इतर निर्णयांप्रमाणेच अभ्यास न करता प्रत्येक गोष्टीवर निर्णय घेऊन टाकायचा हे पालिका प्रशासनाचे धोरणच दिसून येत आहे. रंगमंदिराचा पुनर्विकासाचा आराखडा कसा आणि काय असणार आहे हे लोकांना समजल्याशिवाय ते पुर्नविकासाला मान्यता कसे देतील असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. मेट्रोसाठी सध्याचे सरकार सगळ्या मोक्याच्या जागा बळकावत आहे. शहराच्या दृष्टीने हा सर्वाधिक मोठा धोका असल्याचेही त्यांनी बालगंधर्वची जागा मेट्रोसाठी वापरली जाणार का या प्रश्‍नावर बोलताना नमूद केले. बालगंधर्व रंगमंदिर जमीनदोस्त करून पुणेकरांच्या भावना दुखावून त्यावर मीठ चोळण्याचे काम महापालिकेतील भाजप सरकार करीत आहे. कोणत्याही योजनेचे पुढील 25 वर्षांचे प्लॅनिंग होणे गरजेचे आहे. रंगमंदिर हे ज्याठिकाणी आहे हे त्याच ठिकाणी राहिले पाहिजे ही सर्वसामान्य पुणेकरांची भूमिका असल्याचे डॉ. देसाई यांनी व्यक्त केले.

रंगमंदिराशी जुडलेल्या भावना व्यक्त करताना मोहन कुलकर्णी म्हणाले, बालगंधर्व रंगमंदिराची उभारणी झाली तेव्हा ते आशिया खंडातील सर्वात मोठे रंगमंदिर होते. एखादी वास्तू ही जेव्हा जुनी होते तेव्हा ऐतिहासिक दृष्ट्या तीचे महत्त्व वाढत जाते. बालगंधर्व रंगमंदिर ही वास्तू न पाडता नुतनीकरणातून तिचे पुनरूत्थान होणे आवश्यक आहे. पैशांची सुबकता आल्यानंतर ती कला पोटतिडकीतून होत नसल्याचेही त्यांनी सांगितले. सुनिल महाजन म्हणाले, जोपर्यंत महापालिकेकडून सांस्कृतिक धोरण ठरत नाही. तोपर्यंत शहरात नुसत्या चर्चाच पार पडतील. पुण्याची सांस्कृतिक शहर ही ओळख जपण्यासाठी सांस्कृतिक चळवळ उभी राहण्याची आवश्यकता आहे. 

बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासंदर्भात महापालिकेची भूमिका स्पष्ट करताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, महापालिकेच्या अर्थसंकल्पात बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाची संकल्पना मांडली आहे. ती सध्या प्राथमिक अवस्थेत असून यामध्ये सर्वांचा विचार घेऊनच पुढील काम केले जाणार आहे. नाट्य, कला, संगीत, साहित्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असलेल्या समितीची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच, बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करताना पुणेकरांच्या सूचनाही मागविल्या जाणार आहे.