Thu, Jan 17, 2019 10:12होमपेज › Pune › दारूड्या पतीला सक्तमजुरी

दारूड्या पतीला सक्तमजुरी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार्‍या दारूड्या पतीला 7 वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.एन.सलीम यांनी सुनावली आहे.  

ज्ञानेश्वर नरहरी पवार (वय 55, रा. भोर, जि. पुणे) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याला पत्नी सुनीता (वय 45) यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुनीता यांचा भाऊ किरणकुमार दत्तात्रय आगनेन (वय 38, रा. पौड, ता.मुळशी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ही घटना 21 सप्टेंबर 2013 रोजी दुपारी 4.45 च्या सुमारास पौड येथे घडली. ज्ञानेश्वर आणि सुनीता यांचा विवाह 1992 मध्ये झाला.

ज्ञानेश्वर याला दारूचे व्यसन होते. तो सुनीता यांच्या चारित्र्यावर संशय घेत. त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास देत असत. या त्रासाला कंटाळून त्या विवाहानंतर 4 ते 5 वर्षांनी वडिलांच्या घरी म्हणजे माहेरी येऊन राहिल्या. तेथेही जाऊन तो त्यांना मारहाण करत असे. घटनेच्या दिवशीही तो तेथे गेला. तू चांगली वागत नाही’, असे म्हणत डोक्यात दगड घालून त्याने त्यांचा खून केला. या प्रकरणात पौड पोलिसांनी ज्ञानेश्वर याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 302 (खून) नुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात सहायक जिल्हा सरकारी वकील सुनील हांडे यांनी 7 साक्षीदार तपासले. त्यामध्ये मृत विवाहितेच्या वडिलांची साक्ष महत्त्वाची ठरली.  न्यायालयाने आरोपी ज्ञानेश्वरला 304 (सदोष मनुष्यवध) नुसार दोषी धरून शिक्षा सुनावली.