Thu, Aug 22, 2019 10:13होमपेज › Pune › धनगर समाजात शासनाविरुद्ध खदखद!

धनगर समाजात शासनाविरुद्ध खदखद!

Published On: Jun 06 2018 1:43AM | Last Updated: Jun 06 2018 1:22AMपुणे : पुढारी वृत्तसंकलन

नगर जिल्ह्यातील चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात आरक्षणाच्या मुद्यावरून गोंधळ झाला होता. त्यावेळी आंदोलनकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल केले. दरम्यान, आयोजनकर्ते  हे सरकारमधील प्रतिनिधी असल्याने त्यांना हा घोषणांचा गोंधळ आवडला नाही. त्यातूनच दिसेल त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वास्तविक आरक्षण मागणे हे पवित्र काम असून, एवढे गंभीर गुन्हे दाखल करायला कोणी खून, दरोडा, बलात्कार तर केला नाही ना? असा संतप्त सवाल धनगर समाजातून निघत आहे.

मागील अनेक वर्षांपासून धनगर समाज बांधव आरक्षणाच्या मुद्द्यावर शासनाशी संघर्ष करत आहेत. परंतु, अनेक नेत्यांनी त्यांना केवळ आश्‍वासनांचे गाजर दाखवत स्वत:ची पोळी भाजून घेतली आहे. याच आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही नेत्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषविले, तर काही भूषवित आहेत. अनेकांनी राज्य महामंडळाच्या पदाला विळखा घातला आहे. दुसरीकडे अनेक राजकीय पक्षांच्या सत्ता आल्या आणि गेल्या. मात्र, धनगर आरक्षणाचा प्रश्‍न कोणीच आजपर्यंत सोडवू शकले नाही.

विशेष म्हणजे धनगरांना मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत आरक्षण देण्याची घोषणा तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आज मात्र ते मुख्यमंत्री असताना वेळकाढूपणा करत असल्याचा गंभीर आरोप धनगर समाजातूनच होत आहे. चौंडी येथे केवळ ‘आरक्षण द्या’, ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ अशी घोषणा दिल्यानंतर पोलिसांनी एका कार्यकर्त्याला बेदम मारहाण करायला सुरुवात केल्याने गोंधळास सुरुवात झाली. वास्तविक या घटनेला जबाबदार पोलिस आहेत. हा गोंधळ पोलिसांनीच घडवून आणला आहे. दर्शनासाठी आलेले भक्त, नोकरदार, विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा प्रकार म्हणजे धनगर समाजाचा आवाज दाबण्याचा प्रकार असल्याचा आवाजही आता येत आहे. एकंदरीत चौंडीतील घटनेमुळे राज्यशासनाविरुद्ध धनगर समाजामध्ये तीव्र रोष आहे.