Sat, Nov 17, 2018 08:13



होमपेज › Pune › आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी 'र' चा 'ड' केला : धनगर नेत्यांचा आरोप; १ ऑगस्‍टपासून आंदोलनाची हाक

सरकार धनगर समाजाची दिशाभूल करतंय : जानकर; १ ऑगस्‍टपासून आंदोलनाची हाक

Published On: Jul 30 2018 2:20PM | Last Updated: Jul 30 2018 2:33PM



पुणे : प्रतिनिधी 

राज्यातील दीड कोटी धनगर समाजाला गेल्या ७० वर्षापासून घटनादत्त आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी अस्तित्वात नसलेली धनगड आदिवासी जमात उभी करुन समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले आहे.  २०१४ साली राज्यातील धनगर समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यावर ठाम विश्वास ठेवून सरकार आणले. परंतु, मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यापेक्षा धनगरांना आरक्षण मिळूच नये अशी कायदेशीर तयारी चालविली असल्याचा आरोप उत्तम जानकर आणि गोपीचंद पडळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. 

गेल्या तीन वर्षापासून राज्यातील सर्व तहसिलदार, जिल्हाधिकारी, जातपडताळणी समिती, आदिवासी  मंत्रालय यांच्याकडून माहिती अधिकारात माहिती घेतली असता एकही धनगड आढळून आला नाही. दरम्यान, धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात मिळून ९३ हजार धनगड, तर एकूण १९ लाख ५० हजार बोगस आदिवासी दाखविले आहेत. यावर आदिवासी समाजाने त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात न मिळणारे ९.५ आमदार, तर ३० टक्के अनुदान आणि ३० टक्के नोकऱ्या या इतर समाजाच्या बोगसगिरी करुन हडपल्या आहेत, त्यामुळे सर्व आदिवासी मंत्री, आमदार व बोगस लाभधारक व नोकरीधारकांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी जानकर यांनी यावेळी केली..  

राज्यातील धऩगर समाजाची एकच मागणी असून र चा ड झालेला आहे. ते देशातील अन्य राज्यांप्रमाणे दुरुस्त करावे. मात्र, आघाडी सरकराच्या काळात खासदार भाऊसाहेब वाकचोरे यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात र चा ड झालेले नसून धनगर व धनगड या भिन्न जाती आहेत. त्यांच्या चालीरिती रुढी पंरपरा, देवदेवता वेगळे असल्याची खोटी माहिती दिली. तसेच मंबई उच्च न्यायालयात मधू शिंदे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सरकारकडून आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांनी धनगर व धनगड या भिन्न जाती आहेत. र चा ड झाला नाही. तसेच 'टिस'च्या माध्यमातून आरक्षण देणार असल्याची खोटी माहिती सादर केली आहे. त्यामुळे या दोघांवर संसदेची आणि न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी, तसेच धनगर समाजाची फसवणूक केल्याप्रकणी फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पडळकर यांनी यावेळी केली. 

समस्त धनगर समाजाच्या वतीन सरकारला हा अंतिम इशारा असून सरकारने राज्यात एकतरी धनगड दाखवावा अन्यथा १ सप्टेंबर २०१८ पूर्वी महाराष्ट्रातील धनगरांना एसटीचा दाखला द्यावा, अशी मागणी जानकर यांनी यावेळी केली.

धनगर आरक्षणाच्या अखेरच्या लढ्याला १ ऑगस्‍टपासून पुण्यातून सुरवात 

समस्त धनगर समाजाच्या वतीन धऩगर समाजाच्या आरक्षणाच्या अखेरच्या लढ्य़ाला १ ऑगस्‍टला पुण्यातील कर्वे नगर येथील दुधाने लॉन्‍स येथून लाखो बांधवाच्या साथीने सुरवात होणार आहे. यावेळी धनगर आरक्षणाच्या धगधगत्या स्फुर्ती गीताच्या ध्वनी चित्रफितीचे प्रकाशन यावेळी करण्यात येणार असल्याची माहिती गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.