Fri, Apr 26, 2019 09:22होमपेज › Pune › लोहगावातील हरणतळ्याचा विकास होणे गरजेचे!

लोहगावातील हरणतळ्याचा विकास होणे गरजेचे!

Published On: Jul 21 2018 1:32AM | Last Updated: Jul 21 2018 12:34AMयेरवडा : उदय पोवार

पर्यटनस्थळाचा दर्जा असलेले ऐतिहासिक हरण तळ्याचा कात्रज तलावाप्रमाणे पुणे महापालिकेने विकास करणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी हिरिरीने लक्ष दिल्यास नक्कीच ऐतिहासिक हरणतळ्याला सौंदर्य प्राप्त होऊन लोहगावच्या वैभवात भर पडेल. लोहगाव हद्दीचा एकूण 13 कि.मी.चा परिसर आहे. यापूर्वी ग्रामपंचायत असल्याने आर्थिक निधीची मर्यादा असल्यामुळे सोयी-सुविधा देखील नागरिकांना पुरविणे शक्य झाले नाही. आता समावेश झाल्यानंतर तरी महापालिकेने लोहगावचा जर नियोजनबध्द विकास करणे आवश्यक आहे. सध्या ड्रेनेज लाईनच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे ड्रेनेज लाईन बदली केल्या जातील. याचबरोबर गावाच्या सभोवतालसह अंतर्गत  रस्ते देखील विकसित करणे आवश्यक आहे.

लोहगावला ऐतिहासीक असे हरणतळे आहे. या हरणतळ्यामध्ये उन्हाळ्यात देखील मोठ्या प्रमाणात पाणी असते. या हरणतळ्याचा विकास कात्रज तलावाच्या धर्तीवर महापालिकेने केला तर नक्कीच हा सुंदर परिसर हा तळ्यात बोटींग करण्यासाठी पर्यटक भेट देतील. त्यातून महापालिकेचे उत्पन्न देखील वाढेल. फक्त हे करण्यासाठी  लोकप्रतिनिधी व मनपा अधिकार्‍यांच्या इच्छा शक्तीची आवश्यकता आहे. 

सद्यस्थितीत लोहगावची विकास कामे ठप्प आहेत. नागरीकांना दैनंदिन भेडसावणार्‍या तक्रारींची दखल देखील घेतली जात नाही. महापालिकेच्या लोहगाव येथील संपर्क कार्यालयातून समस्या सोडविल्या जात नाहीत. रस्त्यांवर सर्वत्र पावसामुळे खड्डे पडले आहेत. ते तातडीने बुजविणे गरजेचे आहे. आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला असून साथीचे आजार रोखण्यासाठी तातडीने औषध फवारणी करून आरोग्य विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.

याबाबात नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक महापालिका आयुक्त सुनील गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, लोहगावच्या विकासासाठी निधीची आवश्यकता आहे. हरणतळे परिसरात आपण वृक्षारोपण केले आहे. याचबरोबर हरणतळ्याचा विकास करण्यासाठी आपण स्वतंत्र निधी मागणार असून त्याबाबत नगरसेवकांशी देखील बोलणे झाले आहे. नागरीकांना येणार्‍या दैनंदिन समस्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधावा.