Thu, Apr 25, 2019 15:48होमपेज › Pune › डेंग्यूचे 57 संशयित; मलेरियाचे दोन पॉझिटिव्ह

डेंग्यूचे 57 संशयित; मलेरियाचे दोन पॉझिटिव्ह

Published On: Jun 06 2018 1:43AM | Last Updated: Jun 06 2018 12:14AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी चिंचवड शहरामध्ये मे महिन्यामध्ये डेंग्यूचे 57 संशयित, तर मलेरियाचे दोन पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने ही माहिती दिली. 
शहरासह परिसरात उघड्या गटारातून वाहणारे पाणी, माश्या, मच्छर, दुर्गंधीमुळे मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. मे महिन्यामध्ये आत्तापर्यंत डेंग्यूचे 57 संशयित  तर मलेरियाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

थोड्याच दिवसांत पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सतत बदलणार्‍या हवामानामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून मलेरिया, ताप आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. ढगाळलेले वातावरण, थंड वारे, गारवा मध्येच दमट हवामान या बदलामुळे साथीच्या आजारांत वाढ झाली आहे. पर्यावरणातील या बदलामुळे प्रकृतीत असंतुलन निर्माण होऊन काही ताप, डोकेदुखी, अंग दुखणे, सर्दी, खोकला, वात विकार, हाडे दुखणे आदी आजार वाढले असून दवाखाने, रुग्णालयात नेहमीपेक्षाही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. हवेच्या माध्यमातून होणार्‍या संसर्गाने ताप येण्याचे प्रमाण वाढले असून अंगदुखी, डोकेदुखी, घसा खवखवणे अशा तक्रारींतही वाढ झाली आहे. महापालिकेच्या रुग्णालयाबरोबरच आरोग्य केंद्रेदेखील उपचारासाठी येणार्‍या रुग्णांमुळे फुल्ल झाली आहेत.

जानेवारी महिन्यामध्ये आत्तापर्यंत  एकूण 7 हजार  212  तापाचे रुग्ण आढळले. रुग्णांपैकी मलेरियाचा  1 पॉझिटीव्ह रुग्ण, डेंग्यूचे 46 व चिकुनगुनियाचे  3 संशयित रुग्ण आढळले.  
फेब्रुवारीमध्ये 5 हजार 646 तापाच्या रुग्णांपैकी डेंग्यूचे 12 व चिकुनगुनियाचे 2 संशयित रुग्ण सापडले. मार्च महिन्यामध्ये 4 हजार 810 तापाच्या रुग्णांपैकी डेंग्यूचे 11 व चिकुनगुनियाचा 1 संशयित रुग्ण आढळला. मार्च महिन्यामध्ये 4 हजार 421 तापाच्या रुग्णांपैकी मलेरियाचा 1 पॉझिटीव्ह, डेंग्यूचे 
8 संशयित रुग्ण आढळले. मे महिन्यात मलेरियाचे 2 पॉझिटीव्ह आणि डेंग्यूचे 
57 संशयित रुग्ण आढळले.