Fri, Jul 19, 2019 01:46होमपेज › Pune › राजर्षी शाहू महाराजांना ‘भारतरत्न’ द्या’

राजर्षी शाहू महाराजांना ‘भारतरत्न’ द्या’

Published On: Mar 20 2018 1:40PM | Last Updated: Mar 20 2018 1:40PMपिंपरी : प्रतिनिधी

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य समता आणि सलोखा राखणारे आहे. अस्पृश्यता निवारण, महिला अत्याचारबंदी, सक्तीचे शिक्षण, जल व्यवस्थापन अशा सर्वच क्षेत्रात राजर्षी शाहूंनी मोलाचे कार्य करून ठेवले आहे. त्यामुळे राजर्षी शाहू या लोकराजांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारी ‘भारतरत्न’ पदवी मरणोत्तर द्यावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

राजर्षी शाहू महाराजांनी जे करून ठेवले आहे ते काळाच्या पुढचे महान काम आहे. त्यांनी कृतीतून समाजबांधणीचे काम केले आहे. त्यांचे विचार हे समता आणि बंधुता निर्माण करणारे आहेत. देशाला आज याच विचारांची गरज आहे. तरुणांना या विचारांची प्रेरणा आवश्यक आहे. ब्रिटिशांविरोधातील स्वातंत्र्यलढ्यासाठी त्यांनी शिवाजी क्लब; तसेच लोकमान्य टिळक यांच्या नेपाळ येथील कारखान्यास आर्थिक व सर्वतोपरी मदत करून योगदान दिले. शाहू महाराज हे दूरदृष्टीचे होते. त्यांनी जातीय निर्मूलन भाषणातून नव्हे, तर कृतीतून केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मूकनायक हे वर्तमानपत्र काढण्यासाठी आर्थिक मदत केली. सर्व समाजांच्या कल्याणासाठी त्यांनी काम केले आहे. शाहू महाराजांचा स्त्री शिक्षणाबद्दल व्यापक दृष्टिकोन होता. त्यांनी विधवा पुनर्विवाह कायदा १९१७ साली, तर स्त्रियांवरील अन्याय निर्मूलन कायदा १९१९ साली केला. त्यांच्या सर्वंकष कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने ‘भारतरत्न’ द्यावे, अशी मागणी सतीश कदम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.