Wed, Apr 24, 2019 11:43होमपेज › Pune › मावळातही अनेक धर्मा पाटील न्यायाच्या प्रतीक्षेत

मावळातही अनेक धर्मा पाटील न्यायाच्या प्रतीक्षेत

Published On: Feb 06 2018 1:48AM | Last Updated: Feb 06 2018 1:18AMदेहूरोड : उमेश ओव्हाळ

जमिनीला योग्य मोबदला मिळावा, या न्याय मागणीसाठी मंत्रालयात विष पिऊन धर्मा पाटील यांनी आपले जीवन संपविले. न्यायाच्या प्रतीक्षेत नागवलेले अनेक शेतकरी महाराष्ट्रातील सगळ्याच जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातही विविध शासकीय विभागात किरकोळ कारणापासून तर जबरदस्तीने जमीन बळकावण्याच्या प्रकारापर्यंतची अनेक प्रकरणे वर्षानुवर्षे सरकारी फायलींमध्ये धूळखात पडली आहेत. किमान धर्मा पाटील यांच्या बलिदानानंतर तरी या फाईलींवरील धूळ झटकली जाईल, अशी भाबडी आशा या शेतकर्‍यांमध्ये निर्माण  झाली आहे.

मावळ तालुक्यात सुमारे 181 गावे आणि वाड्या-वस्त्या आहेत. शेती हा या लोकांचा प्रमुख व्यवसाय. पण मागील दोन दशकांपासून मुंबई-पुण्यासारख्या बड्या शहरांतील बिल्डर, भांडवलदार आणि गुंतवणूकदारांची मावळच्या सुपीक जमीनीवर नजर पडली. तेव्हापासून जमीनींचे भाव गगनाला भिडले. जमिनीला सोन्याचा भाव आल्यामुळे जमीन विकण्याकडे लोकांचा कल वाढला आणि साहजिकच त्यातून कौटुंबिक कलहास सुरूवात झाली.

अंतर्गत वादामुळे हजारो दावे दाखल झाले आहेत. अगदी तलाठ्यापासून जिल्हाधिकार्‍यांपर्यंत आणि प्रथम वर्ग न्यायालयापासून उच्च न्यायालयापर्यंत जमीनीसंदर्भातील दावे दाखल आहेत. यापैकी न्यायालयात न्यायप्रविष्ट दाव्यांचा भाग सोडला; तर महसूल विभागातील विविध अधिकार्‍यांकडील दाव्यांची अतिशय दयनिय स्थिती आहे. वर्षानुवर्षे केवळ तारीख पे तारीख सुरू आहे. पण निवाडा होत नाही. दहा-बारा गुंठ्यांच्या जमीनीच्या तुकड्यासाठी काहींच्या पिढ्या संपल्यात, पण दावे निकाली निघु शकले नाहीत. वारसनोंदीच्या किरकोळ कारणासाठी काहीजणांना पाच-सहा वर्षांपासून सरकारी कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागत आहेत. 

अशाच एका प्रकरणाने त्रस्त असलेले केशव ओव्हाळ यांनी सांगितले की, मावळ तालुक्यतील जांभुळ हे त्यांचे गाव आहे. सातबारावर वारसनोंदीसाठी एक प्रकरण त्यांच्या वडीलांनी 2012 मध्ये प्रांत कार्यालयाकडे दाखल केले होते. दोन वर्षानंतर त्यांचे निधन झाले, पण प्रकरण अजूनही जैसे थे आहे. विशेष म्हणजे या पाच वर्षाच्या काळात कधी प्रांत कार्यालय, कधी विधानभवन तर कधी निवडणूक विभाग अशा विविध सरकारी कार्यालयात हे प्रकरण फिरत राहिले. तारखांमागून तारखा पडत राहिल्या. वडिलांच्या जागी ओव्हाळ यांना आता चकरा माराव्या लागत आहेत.

या प्रकरणासोबत अशाप्रकारची जवळपास दोनशेच्यावर प्रकरणे केवळ मावळ तालुक्यातूनच या कार्यालयात पडून आहेत. या सोबतच जिल्ह्यातील अन्य तालुक्यांचीही हजारो प्रकरणे धूळखात पडली आहेत. या सर्वांना न्याय कधी मिळणार, असा प्रश्‍न आहे. धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर खडबडून जाग्या झालेल्या यंत्रणेला आता तरी या प्रकरणांची तड लावण्याची सुबुध्दी सुचेल, अशी आशा प्रभावित शेतकरी व्यक्त  करीत आहेत.