होमपेज › Pune › फुटलेल्या जलवाहिनीत मिसळतेय मैलापाणी

फुटलेल्या जलवाहिनीत मिसळतेय मैलापाणी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

देहूरोड ; वार्ताहर

देहूरोड पोलिस ठाण्याच्या समोर सध्या पुणे-मुंबई महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या कामानिमित्त खोदकाम सुरु असताना मैलाटाकीचे चेंबर फुटले. त्यातील घाण व मैला उघड्यावर पसरला असून त्यामुळे पोलिस ठाण्याच्या आवारात प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. त्यातच पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी नेमकी या मैलापाण्याच्या डबक्यातच फुटली आहे. पिण्याच्या पाण्यात हे दूषित पाणी मिसळत असल्याने पोलिसांच्याच आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

देहूरोड पोलिस ठाण्याच्या आवारातील मैलाटाकीचे रस्त्याच्या खोदकामात नुकसान झाले. टाकीतील मैलापाणी पोलिस ठाण्याच्या आवारात पसरले आहे. सुमारे दोन आठवड्यांपासून ही परिस्थिती कायम आहे. स्थानिक प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण मोरे यांनी केला आहे. फुटलेल्या टाकीतून वाहणारे सांडपाणी पसरू नये यासाठी छोटा चर खोदण्यात आला आहे. मात्र, या चरातच शुध्द पाणीपुरवठा करणारी एक जलवाहिनी फुटली आहे. पाणीपुरवठा सुरू असताना फुटलेल्या जागेतून पाण्याचे फवारे बाहेर येत असतात. पण पुरवठा बंद होताच दूषित सांडपाणी या जलवाहिनीत शिरते, असे काही कर्मचार्‍यांनी सांगितले.

या प्रकारामुळे पोलिसांना अतिशय अनारोग्यकारक परिस्थितीचा मुकाबला करावा लागत असल्याचे अधोरेखित झाले आहे. पोलिसांना उपेक्षितांसारखे जगण्याची सवय झालीय. पण अशा परिस्थितीत एखाद्या आरोपीला बाधा झाल्यास जबाब कुणाला द्यावा लागेल, असा रोकडा प्रश्‍न एका पोलिस कर्मचार्‍याने उपस्थित केला. देहूरोड पोलिस ठाण्याच्या कोठडीत अनेक नामचिन आरोपींना कोठडीत ठेवण्यात आले आहे. कोरेगाव भीमा दंगलीला कारणीभूत असल्याचा ठपका असलेले मिलिंद एकबोटे यांनाही या ठिकाणी ठेवण्यात आले होते. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षित वातावरण आवश्यक आहे. आरोपींना खाण्यापिण्यातून विषबाधा होऊ नये, यावर विशेष लक्ष दिले जाते. मात्र, सध्याच्या परिस्थितीमुळे आरोग्याचा गंभीर प्रश्‍न उद्भवला आहे.
 


  •