Tue, Jul 23, 2019 04:03होमपेज › Pune › बीज सोहळ्यासाठी देहूनगरी सज्ज

बीज सोहळ्यासाठी देहूनगरी सज्ज

Published On: Mar 03 2018 1:45AM | Last Updated: Mar 03 2018 12:52AMउमेश ओव्हाळ

देहूरोड : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठगमन दिन अर्थात बीजोत्सवासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे. भाविकांच्या सुविधांना केंद्रस्थानी ठेवून शासकीय पातळीवर सर्व तयारी पूर्ण झाली आहे. संत श्री तुकाराममहाराज संस्थानच्या वतीने बीजसोहळ्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

प्रयाणकाळी देवें विमान पाठविले। कलीच्या काळामाजी अद्भूत वर्तविले ।मानव देह घेऊनी निज धामा गेले । निळा म्हणे संता तोषविले । 

संत तुकाराम महराजांच्या वैकुंठगमनाचे संत निळोबांनी अशाप्रकारे वर्णन केले आहे. या ओव्या आजही देहूच्या गोपाळपुर्‍यातील वैकुंठस्थान मंदिराच्या प्रवेशद्वारावर कोरलेल्या दिसतात. या बीज सोहळ्यासाठी देहूत दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होतात. यावर्षीच्या सोहळ्यासाठी मागील चार दिवसांपासून भाविक देहूत दाखल होत आहेत. इंद्रायणीचा घाट पहाटेपासूनच वारकर्‍यांच्या गर्दीने फुललेला दिसू लागला आहे. देहूतील रस्ते भाविकांच्या गर्दीने ओसंडून  वाहताना दिसताहेत. 

भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे भाविकांना पिण्यासाठी पुरेसे व शुध्द पाणीपुरवठ्यावर प्रशासनाचा सर्वाधिक भर आहे. पाणी शुध्दीकरणाच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी जलशुध्दीकरण केंद्रावरच वैद्यकीय अधिकारी तैनात करण्यत आले आहेत. वैकुंठस्थान, गाथा मंदिर, मुख्य मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीने तात्पुरते बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आले आहेत. गावातील 14 धर्मशाळा, जिल्हा परिषदेची शाळा तसेच नागरिकांच्या खासगी जागेतही भाविकांची निवासाची सोय करण्यात आली आहे. हॉटेल्स् व उपहारगृहांची स्वच्छतेची तपासणी पूर्ण झाली आहे.

यावर्षी प्रथमच ड्रोनच्या साह्याने सर्व सोहळ्याचे  चित्रीकरण करण्यात येणार आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला आहे.  गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी गोपाळपुरा भागात टेहळणी मनोरा उभारला आहे. संत तुकाराम संस्थानच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाली असून बीज सोहळ्याचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे.