होमपेज › Pune › वारकर्‍यांसाठी दररोज 110 बसेस धावणार

वारकर्‍यांसाठी दररोज 110 बसेस धावणार

Published On: Jul 01 2018 2:15AM | Last Updated: Jul 01 2018 1:45AMपुणे : संतश्रेष्ठ  ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रस्थानासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएल) अतिरिक्त बसची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. 3 ते 7 जुलैदरम्यान स्वारगेट, महानगरपालिका स्थानक, हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड या ठिकाणांहून दर दिवशी 110 बसेस श्री क्षेत्र आळंदीकडे जाण्यासाठी सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या विविध कानाकोपर्‍यातून येणार्‍या वारकर्‍यांना बससेवेचा फायदा होणार आहे.

पालखी प्रस्थानासाठी हजारो भाविक पुण्याहून श्री क्षेत्र आळंदीकडे प्रवास करतात. त्यासाठी त्यांना वेळेत बस उपलब्ध करून देण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाने दरवर्षीप्रमाणे 20 अतिरिक्त बसचे नियोजन केले आहे. तसेच प्रस्थानाआधी 6 जुलैला रात्री बारा वाजेपर्यंत बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. तर श्री क्षेत्र देहूकडे जाण्यासाठी पुणे स्टेशन, महानगरपालिका, निगडी या ठिकाणांवरून संचलनात असणार्‍या 20 बसेस महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत. 

याशिवाय देहू ते आळंदी अशा 19 बसेस उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. या व्यतिरिक्त नेहमीच्या संचलनात असणर्‍या बसेस सकाळी साडेपाच वाजल्यापासून पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील भाविकांसाठी 80 बस संचलनात राहणार आहेत. तसेच पुण्याहून पंढरीच्या दिशेने पालखी निघताना 9 जुलैला हडपसरमध्ये पालख्या दर्शनासाठी दुपारी थांबणार असल्याने, या वेळेस महात्मा गांधी स्थानकाजवळ पुणे स्टेशन, वारजे माळवाडी, कोथरुड डेपो, निगडी, आळंदी ठिकाणी जाण्यासाठी बससेवेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 

दोन्ही पालखी प्रस्थान सोहळा सोलापूर व सासवड रस्त्याने मार्गस्थ होणार असल्याने  सोलापूर-उरुळीकांचन मार्ग जसजसा वाहतुकीसाठी खुला होईल, तशी बसवाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे. हडपसर ते सासवड दरम्याचा दिवेघाट रस्ता वाहतुकीस पूर्णतः बंद राहणार आहे. 

दरम्यान, प्रवासी भाविकांच्या वाहतुकीच्या सोईसाठी या मार्गाची बसवाहतूक दिवेघाटऐवजी बोपदेव घाटमार्गे, अशी सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी बसेसचे संचलन स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर असे राहणार असून, 60 जादा बसेसचे नियोजन करण्यात आल्याची माहिती पीएमपीएमएल प्रशासनाने दिली आहे.