Fri, Jul 19, 2019 18:04होमपेज › Pune › नवाब मलिकांच्या विरोधातील खटला मागे

नवाब मलिकांच्या विरोधातील खटला मागे

Published On: Sep 14 2018 2:42PM | Last Updated: Sep 14 2018 2:42PMपुणे : प्रतिनिधी  

पत्रकार परिषदेत पालकमंत्री गिरीश बापट भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केल्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला अब्रुनुकसानीचा खटला शुक्रवारी एकमताने मागे घेण्यात आला. 
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांच्या न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने हा खटला मागे घेतला.

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी यांनी पुणे न्यायालयात मलिक यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला होता. ‘नवाब मलिक यांनी १९ नोव्हेंबर २०१५ रोजी मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी बापट यांनी तूरडाळीचे निर्बंध शिथिल करून डाळ विकण्यास परवानगी देऊन दोन हजार कोटींचा घोटाळा केला. बापट हे भ्रष्टाचारी असल्याने त्यांना त्वरित मंत्रिपदावरून हटवावे,’ असे आरोप केले होते. हे वृत्त विविध वृत्तवाहिन्या आणि पुण्यातील दैनिकांमध्ये प्रसिद्ध झाले. त्यामुळे आपली बदनामी झाल्याचे बापट यांनी न्यायालयातील जबाबात म्हटले होते.

माल जप्त केला; त्याची किंमत ५४० कोटी रुपये होती. त्यामध्ये तूरडाळ १४० कोटींची होती. बाँडवर जी डाळ पुन्हा बाजारात आणली तिची किंमत ४३ कोटी होती. त्यात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नसल्याचे बापट यांनी तेव्हा सांगितले होते. तसेच मलिक यांना मागील निवडणुकीतील पराभव पचवता आलेला नसल्याने हा आरोप केल्याचेही बापट यांनी म्हटले होते. 

कलम ५०० नुसार गुन्हा
बापट यांनी न्यायालयात  दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन मलिक यांनी तक्रारदार यांची बदनामी करणारे वक्तव्य केले असून हा प्रकार भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ५०० नुसार गुन्हा आहे. या प्रकरणी मलिक यांना समन्सही बजावण्यात आले होते. बापट यांच्या वतीने ॲड. एस. के. जैन आणि अॅड. अमोल डांगे यांनी ही याचिका दाखल केली होती. शुक्रवारी ( १४ सप्टेंबर) सकाळी बापट आणि मलिक हे खटला मागे घेण्यासाठी न्यायालयात उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी खटला मागे घेण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आणि खटला मागे घेतला.