Tue, Jul 23, 2019 02:32होमपेज › Pune › पिंपरी :पाणीपट्टी दरवाढीचा आज फैसला

पिंपरी :पाणीपट्टी दरवाढीचा आज फैसला

Published On: Feb 28 2018 1:13AM | Last Updated: Feb 28 2018 1:11AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड शहरातील कुटुंबांना 6 हजार लिटरपुढील पाणी वापरास प्रति 1 हजार लिटरसाठी 8 रुपये दरवाढीचा स्थायी समितीच्या निर्णयावर बुधवारी (दि. 28) होणार्‍या सर्वसाधारण सभेत निर्णय होणार आहे. ही दरवाढ कायम राहणार की, कमी होणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. 

पाणीपुरवठा देखभाल व दुरुस्तीवर होणारा खर्च भागविण्यासाठी पालिका प्रशासनाने पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर 24 जानेवारीच्या सभेत मांडला होता. त्या दरवाढीस उपसूचनेसह समितीने मान्यता दिली. शहरातील कुटुंबांना महिना 6 हजार लिटर पाणी मोफत देऊन त्यापुढे प्रति 1 हजार लिटरचा पाण्याचा दर 8 रुपये असणार आहे. दर वर्षी 10 टक्क्यांऐवजी 5 टक्के दरवाढ करण्यास येणार आहे. दर महिन्यास 200 ऐवजी 100 रुपये सर्व्हिस चार्ज आहे. असा निर्णय समितीने घेऊन अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेकडे शिफारस केली आहे

तसेच, अमृत योजनेअंतर्गत 24 बाय 7 पाणीपुरवठा योजनेसाठी आंद्रा व भामा-आसखेड धरणातून 300 एमएलडी पाण्याचा उपसा करण्यात येणार आहे. त्यासाठी 806 कोटी खर्च होणार आहे. हा खर्च वसूल करण्यासाठी निवासी मिळकतकरातील पाणीपट्टी लाभकर 4 वरून 8 टक्के आणि पाणीपट्टी नसलेल्या मिळकतधारकांना 5 टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यास स्थायी ने 7 फेबु्रवारीच्या सभेत मान्यता दिली.पाणीपट्टी व मिळकतकरातील पाणीपट्टी लाभकर दरवाढीस राष्ट्रवादी,  शिवसेना व मनसेने विरोध दर्शविला आहे. मंगळवारी (दि.20) या पक्षाच्या सदस्यांनी पालिकेसमोर आंदोलन केले होते.  अनेक भागांत रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पिंपळे सौदागर, वाकड अशा काही भागांत बारा महिने टँकरने पाणीपुरवठा होत आहे. असे असताना पाणीपट्टी दरवाढ करून नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम प्रशासन व सत्ताधार्‍यांनी करू नये, असा विरोधकांचा सूर आहे; तसेच आमदार लक्ष्मण जगताप यांनीही एमआयडीसीकडून पाणी न घेता थेट पाटबंधारे विभागाकडून घ्यावे; तसेच पाणीपुरवठा देखभाल व दुरुस्तीवर होणार्‍या खर्चाच्या चौकशीची मागणी केली; तसेच त्यांनी दर कमी करण्याबाबत प्रशासनाला सूचना केल्या. विरोधकांचा कडवा विरोध आणि दरवाढीची प्रशासनाची मागणी यामुळे सभेत पाणीपट्टी पूर्वीप्रमाणे राहणार की, दरवाढीस मान्यता दिली जाते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.