होमपेज › Pune › कर्जमाफी कामाच्या असह्य ताणाचा बळी

कर्जमाफी कामाच्या असह्य ताणाचा बळी

Published On: Dec 04 2017 1:35AM | Last Updated: Dec 04 2017 12:53AM

बुकमार्क करा

मंचर : प्रतिनिधी

शासनस्तरावर कर्जमाफीची माहिती  आणि कामाचा असह्य ताण यामुळे आंबेगाव तालुक्याचे सहाय्यक निबंधक व्ही. आर. खंडागळे (वय 52) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची  घटना शनिवारी घडली. गेल्या एक महिन्यापासून लोणी-काळभोर (ता. हवेली) येथे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार चालू होते.  शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा पहिला सरकारी बळी ते ठरले आहेत. कर्जमाफीसंबंधित कामकाजातील तणाव व वरिष्ठ कार्यालयाकडून सातत्याने बदलत्या सूचना, दबाव येऊन त्यांना ‘ब्रेन हॅमरेज’ झाल्यामुळे त्यांचे निधन झाले, अशी चर्चा आहे. 

आंबेगाव तालुक्याचे सहाय्यक निबंधक म्हणून व्ही. आर. खंडागळे यांनी दीड वर्षापूर्वी पदभार स्वीकारला. याअगोदर ते सोलापूर येथे सहाय्यक निबंधक म्हणून कार्यरत होते. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची माहिती सरकारी पातळीवर पाहिजे असल्याने ते कामात नेहमी व्यस्त असायचे. वरिष्ठ कार्यालयात कर्जमाफीसंदर्भात बैठका, तालुका स्तरावर जिल्हा बँकांचे अधिकारी आणि सोसायटी सचिवांच्या बैठका; तसेच वरिष्ठ कार्यालयाकडून  सतत कर्जमाफीसंदर्भात माहिती मागवत असल्याने दगदग होत होती. खंडागळे हे 27 ऑक्टोबर रोजी मंचर येथील कार्यालयीन काम दिवसभर संपवून  लोणी काळभोर येथील निवासस्थानी  गेले.

अचानकपणे मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना चक्कर आली. त्यांना तातडीने  लोणी काळभोर येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तेथे त्यांच्यावर एक महिन्यात तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. परंतु अशक्तपणा वाढत गेल्याने शनिवारी (दि. 2 डिसेंबर) रात्री 1 वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर सिद्धेश्‍वर निंबोडी (ता. इंदापूर) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. खंडागळे यांच्या मागे पत्नी,  मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. 

असह्य ताणामुळेच वडिलांचा मृत्यू

मृत खंडागळे यांचा मुलगा अक्षय म्हणाला,  वडील 27 ऑक्टोबर रोजी कर्जमाफीच्या याद्या बनविण्यासाठी मंचर येथे कार्यालयात गेले होते. दिवसभर कामाचा असह्य ताण झाल्यामुळे रात्री ते उशिरा घरी आले. त्या वेळी त्यांच्या चेहर्‍यावरील थकवा जाणवत होता. थोडेफार जेवण घेऊन ते बसले होेते. त्यानंतर 28 ऑक्टोबर रोजी रात्री 12.15 वाजता एकदम त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे लोणी काळभोर येथील रुग्णालयामध्ये दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता डोक्यात रक्तस्राव (ब्रेन हॅमरेज) झाला होता. केवळ कामाचा ताणामुळे रक्तस्राव होतो, असे सांगून डॉक्टरांनी त्यावर शस्त्रक्रिया केली. परंतु असह्य कामाचा ताण यामुळे ते आजारी पडले. अखेर त्यांचा मृत्यू झाला.