Tue, Mar 19, 2019 09:55होमपेज › Pune › दापोडीची कार्यशाळा खासगीकरणाच्या वाटेवर

दापोडीची कार्यशाळा खासगीकरणाच्या वाटेवर

Published On: Feb 04 2018 1:56AM | Last Updated: Feb 03 2018 11:37PMपिंपरी : नरेंद्र साठे

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेचा खासगीकरणाचा डाव मांडण्यात येत असल्याची खंत कामगार संघटनेकडून व्यक्त करण्यात येत आहे. एक-एक काम बाहेरून करून घेण्याचे प्रमाण सध्या कार्यशाळेत वाढले आहे. नवीन एसटीच्या चॅसिज खरेदी करून एसटीची बांधणी करण्याचे काम बंद असल्याने कामगारांचे काम कमी झाले. यामुळे कामगारांमधून कार्यशाळेचे खासगीकरण केले जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

कामगारांनी वेळोवेळी स्थानिक आमदार, मुख्यमंत्री यांच्याशी दापोडीतील कार्यशाळेसंदर्भात पत्रव्यवहार केला; परंतु आजपर्यंत कोणीही कामगारांच्या समस्यांची दखल घेतली नसल्याचे कामगार सांगतात. राज्यात एसटी महामंडळाच्या तीन कार्यशाळा आहेत. या तीन कार्यशाळांपैकी दापोडीची कार्यशाळा सर्वांत जुनी आणि मोठी आहे. दापोडीत सर्वाधिक बसची बांधणी करण्यात येत होती, सध्या ही बांधणी ठप्प आहे. चॅसिज खरेदी करून परिवहन विभागाच्या नियमानुसार बसबांधणी करण्यात येते. कमी खर्चात दर्जेदार बसबांधणी व्हावी यासाठी एसटी महामंडळाची स्थापना झाल्यापासून पुण्यात दापोडी येथे विभागीय कार्यशाळा स्थापन झाली.

नवीन बांधणी बंद असून, केवळ जुन्या बसचीच दुरुस्ती कार्यशाळेत सुरू आहे. शिवाय यातील काही कामे बाहेरून करून घेण्याचा घाट वरिष्ठ अधिकार्‍यांकडून घातला जात आहे. यामुळे कामगारांमध्ये नाराजी पसरली आहे. एकेकाळी बसबांधणी क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या दापोडी एसटी कार्यशाळेतील काम सद्य:स्थितीत थंडावले आहे. एसटीच्या ताफ्यातील बसगाड्यांची संख्याही घटली आहे. परिणामी राज्य परिवहन महामंडळाच्या दापोडी येथील मध्यवर्ती कार्यशाळेतील बसबांधणीचे काम थंडावले आहे. नव्या चॅसिजवर बसची बांधणी करणे, राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील राज्यभर धावणार्‍या बसगाड्यांची काही वर्षांनी पुनर्बांधणी करणे, टायर रीमोल्डिंग अशा स्वरूपाची कामे या कार्यशाळेत केली जात आहेत. अत्यंत मजबूत आणि टिकाऊ बसबांधणी हे या कार्यशाळचे वैशिष्ट्य मानले जात असल्याने, दुसर्‍या राज्यातील परिवहन खात्याच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणार्‍या बसगाड्या दापोडी कार्यशाळेत पाठविल्या जात होत्या; परंतु आता हे सर्व काही बंद झाले आहे. 
 

सध्या प्रशासन सर्व कामे ‘आऊट सोर्सिंग’ करत आहे. आमचे म्हणणे आहे, की आम्हाला काम द्या, आम्हाला साधनसामग्री द्या, आम्ही तुम्हाला काम करून दाखवतो. सध्याच्या धोरणामुळे आम्हा कामगारांना दापोडी कार्यशाळा खासगीकरणाकडे जात असल्याची भीती वाटते. सीट, खिडक्या बनवण्याचे साहित्य आणि मशिनरी उपलब्ध करून दिली तर बाहेरच्या पेक्षा कमी खर्चात कार्यशाळेतील कर्मचारी नवीन गाड्या बनवू शकतात.

सुनील सनदी, अध्यक्ष, कास्ट्राईब, रा. प. संघटना, दापोडी