Sun, Apr 21, 2019 13:45होमपेज › Pune › दापोडी-निगडी ‘बीआरटीएस’ मार्ग सुरक्षेबाबत आणखी सूचना

दापोडी-निगडी ‘बीआरटीएस’ मार्ग सुरक्षेबाबत आणखी सूचना

Published On: Jan 08 2018 1:15AM | Last Updated: Jan 07 2018 11:44PM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

तब्बल दहा वर्र्षे रखडलेल्या दापोडी-निगडी ‘बीआरटीएस’ मार्गावर प्रवासी, पादचारी व वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी दिशादर्शक फलकांसह विविध नव्या उपाययोजना करण्याच्या सूचना आयआयटी पवईच्या अधिकार्‍यांनी केल्या आहेत; तसेच रात्रीच्या वेळीही या मार्गाची पाहणी केली जाणार आहे. आठवडाभरात दुसरा अहवाल महापालिकेस देण्यात येणार आहे.  

आयआयटीचे प्रा. वेदगिरी व त्यांच्या दोन विद्यार्थ्यांनी निगडी ते दापोडी व दापोडी ते निगडी या दोन्ही बाजूंच्या ‘बीआरटीएस’ मार्गाची शनिवारी (दि.6) पाहणी केली. त्यांच्यासमवेत महापालिकेचे कार्यकारी अभियंता ज्ञानदेव झुंजारे, एकनाथ पाटील, कनिष्ठ अभियंता बाळासाहेब शेटे, प्रवक्ता विजय भोजने आदी उपस्थित होते. सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेतीन अशी सुमारे चार तास ही पाहणी केली गेली. 
पिंपरी चौकातील ‘बीआरटीएस’च्या डेडिकेटेड मार्गिका चौकापर्यंत असावी, बसथांब्यावर दिशादर्शक फलक, पादचार्‍यांसाठी सिग्नल, आयपीएमएस यंत्रणेची अधिकार्‍यांनी पाहणी केली. चिंचवड येथील एम्पायर इस्टेट येथील मिड ब्लॉक व क्रॉसिंग सिग्नल व्यवस्थेची पाहणी केली. मोरवाडी येथील स्टर्लिंग होडा शो-रूम येथील ‘मर्ज-इन’ फलक व रंगकामाबाबत अधिकार्‍यांनी समाधान व्यक्त केले. बजाज ऑटो येथील  भुयारी मार्गाजवळ पथदिवे लावून प्रकाश व्यवस्था केली आहे. वाहन वळण घेत असल्याने तेथे बहिर्वक्र आरसे लावण्याची सूचना केली. 

पाहणीनंतर प्रा. वेदगिरी यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन अहवालानुसार महापालिकेने उपाययोजना केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. भविष्यात वाहनांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन आणि नवीन सुचलेल्या कल्पना लक्षात घेऊन अहवाल देण्याची सूचना आयुक्तांनी केली. त्यानुसार आठवडाभरात ते महापालिकेस अहवाल देणार आहेत.  अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्वरित त्या संदर्भात उपाययोजना महापालिका करणार असल्याची ग्वाही आयुक्तांनी दिली. आयआयटीच्या अहवालानुसार पादचारी व वाहनचालकांच्या सुरक्षेसंदर्भात महापालिकेने समाधानकारक काम केल्याचे मत प्रा. वेदगिरी यांनी आयुक्त व स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांच्याकडे व्यक्त केले. ‘बीआरटीएस’ मार्ग अधिक सुरक्षित करण्यासाठी रात्रीच्या वेळेतही पाहणी करणार असून, त्यानुसार सूचना महापालिकेस दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले. मार्गावर पुरेशा संख्येने दिशादर्शक फलक लावण्याची सूचना त्यांनी केली.