Sun, Mar 24, 2019 12:50होमपेज › Pune › आईच देते माणसातला परमेश्‍वर शोधण्याचे बाळकडू

आईच देते माणसातला परमेश्‍वर शोधण्याचे बाळकडू

Published On: Feb 18 2018 2:01AM | Last Updated: Feb 18 2018 1:18AM पुणे : प्रतिनिधी

 आपल्या मनातील द्वेष, मत्सर काढून टाकण्याचे आणि माणसातला परमेश्‍वर शोधण्याचे बाळकडू एक आईच देते. आयुष्यातील सुखाचे क्षण आपल्या मुलाला मिळावेत, यासाठी ती आई अखंड धडपडत राहते. तिच्या या धडपडीप्रती कृतज्ञता ठेवत चांगल्या विचारांच्या बळावर यशशिखर गाठण्याचे ध्येय उराशी बाळगले पाहिजे, असे प्रतिपादन त्रिपुरा व बिहारचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी केले.

 श्री आदिशक्ती फाउंडेशनच्या वतीने दिल्या जाणार्‍या ’आऊसाहेब’ आणि ’शिवदास निनाद’ पुरस्कारांचे वितरण डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी इतिहास अभ्यासक सदाशिव शिवदे, फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ता पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यंदा कावेरी श्रीनिवास काळे, मृदगंधा आनंद गुप्ते, शेवंतीबाई शंकर चव्हाण, लक्ष्मीबाई संदिपान जोगदंड, शांताबाई लक्ष्मीनारायण राठी, कमलाबाई भगीरथ राठी, पौर्णिमा अजित परमार यांना ‘आऊसाहेब’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तसेच श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड, मुंबई यांना इतिहास अभ्यासक निनाद बेडेकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ’शिवदास निनाद पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

 डॉ. डी. वाय. पाटील म्हणाले, चांगला माणूस घडविण्याची किमया माता करीत असते. आपल्या प्रत्येकाच्या यशात त्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असतो. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या प्रेरणेनेच मला राज्यपाल पद भूषविता आले. मनात चांगले विचार ठेवून जीवनात चांगले क्षण मिळविण्याचा ध्यास अंगिकारण्याची शक्ती आपल्याला आईकडूनच मिळते.

दत्ता पवार म्हणाले, विविध संकटांचा सामना करुन अपत्यांना प्रगतीपथावर नेणार्‍या कर्तृत्वान मातांचा आदिशक्ती फाऊंडेशनतर्फे सन्मान केला जातो. यंदा पुरस्काराचे सातवे वर्ष आहे. जिजाऊंसारख्या मातांना समाजासमोर आणून नवी पिढी घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. सातही मातांच्या यशस्वी मुलांनी आपल्या मातेप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. प्रा. अर्चिता मडके यांनी सूत्रसंचालन केले.