होमपेज › Pune › रोज १६ पुणेकर सायबर भामट्यांचे बळी

रोज १६ पुणेकर सायबर भामट्यांचे बळी

Published On: Dec 29 2017 1:32AM | Last Updated: Dec 29 2017 12:01AM

बुकमार्क करा
पुणे :  पुष्कराज दांडेकर 

डिजिटल इंडिया या केंद्र सरकारच्या महत्त्वांकाक्षी उपक्रमाला देशभरातील नागरिक भरभरून प्रतिसाद देत आहेत. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून टेक्नोसॅव्ही बनलेल्या नागरिकांना या तंत्रज्ञानाच्या फायद्यासोबत तोट्यालाही सामोरे जावे लागत आहे. या सायबर स्पेसमध्ये तंत्रज्ञानाचा गैरवापर करणारी मंडळी सध्या जोमात आहे. पुणे पोलिसांच्या सायबर शाखेकडे अशा प्रकारे गैरवापर करून नागरिकांना फसविण्याच्या किंवा त्यांची बदनामी करणे अशा प्रकारांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत अडीच पटीने (अडीचशे टक्के) वाढ झाली आहे.

मागील अकरा महिन्यांत दर दिवसाला 16 पुणेकर सायबर भामट्यांच्या जाळ्यात सापडत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या मार्गाने पुणेकरांना भामट्यांकडून कोट्यवधींचा गंडा घातला जात आहे.  संगणक आणि मोबाईल यांच्या तंत्रज्ञानामध्ये दिवसेंदिवस नवनवीन गोष्टींची भर पडत आहे. मोबाईलची जागा स्मार्टफोनने घेतली. 2 जी, 3 जी नंतर आता 4 जी तंत्रज्ञान आले. टेक्नोसॅव्ही बनलेला समाज हा सोशल मीडियामुळे अगदी जगातील कानाकोपर्‍यांपर्यंत जोडला गेला आहे. 

मागील सात वर्षांचा आढावा घेतल्यास पुण्यात सायबर गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. 2010 मध्ये 58, 2011 मध्ये 66, 2012 मध्ये 67, 2013 मध्ये 58, 2014 मध्ये 350 तक्रारी पुणे पोलिसांकडे आल्या होत्या. त्यापैकी 158 गुन्हे दाखल करण्यात आले. 2015 मध्ये 505 अर्ज आले होते. त्यापैकी 161 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 2016 मध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये थेट 93 टक्क्यांनी वाढ झाली. 2079 अर्ज आले त्यापैकी 312 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  

तर, 2017 सालात नोव्हेेंबरपर्यंत या गुन्ह्यांमध्ये अडीचपट वाढ होऊन 5127 तक्रारी सायबर गुन्हे शाखेकडे आल्या आहेत. पुणे शहर तर आता आयटी हब म्हणून ओळखले जात आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप व इतर सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून बदनामी करणे, मैत्री करून भावनिक नात्यांत गुंतवून फसविणे, अशा प्रकारांमुळेही पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाढत्या गुन्ह्यांच्या प्रमाणात पोलिस दलात कर्मचार्‍यांचीही संख्या अपुरी पडत असल्याने त्यांच्यावरील ताणही वाढला आहे.