Wed, Apr 24, 2019 07:46होमपेज › Pune › बनावट इंटरनॅशनल कॉल सेंटरचा पर्दाफाश

बनावट इंटरनॅशनल कॉल सेंटरचा पर्दाफाश

Published On: Feb 08 2018 1:52AM | Last Updated: Feb 08 2018 12:25AMपुणे : प्रतिनिधी 

अमेरिकन आयआरएस (इंटर्नल रेव्हेन्यू सर्व्हिसेस) अधिकारी व बँकेचे वित्तीय अधिकारी असल्याची बतावणी करून हजारो अमेरिकन नागरिकांना लाखो डॉलरला गंडा घालणार्‍या कोरेगाव पार्कस्थित इंटरनॅशनल कॉल सेंटरचा सायबर व आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. या कॉल सेंटरवर छापा टाकून तिघांना अटक केली, तर त्यांच्याकडून 1 लॅपटॉप, 8 संगणक हार्डडिस्क, 3 मोबाईल व महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत, अशी माहिती सायबर व आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली. 

शिवक प्रीतमदा लधानी (29, धानोरी), प्रतीक सुभाषचंद्र पांचाल (30, कोरेगाव पार्क), शेरल सतीषभाई ठाकर (33, कोरेगाव पार्क) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क  येथील  इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर रात्री नऊ ते सकाळी सातपर्यंत कॉल सेंटर सुरू असून या ठिकाणी अमेरिकेतील नागरिकांना गंडवले जात असल्याची माहिती सायबर व आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे सापळा रचून छापा टाकला त्यावेळी तीनजण कॉल सेंटर चालवीत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी तिघांनाही अटक करत त्यांच्याकडून 1 लॅपटॉप, 8 संगणक हार्डडिस्क, 3 मोबाईल, 8 हेडफोन व इतर महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. त्यांना न्यायालयाने 9 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर पोलिसांनी केलेल्या तपासात त्यांची परराज्यातही अशीच बनावट कॉल सेंटर सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यांना अमेरिकन नागरिकांचा डाटा कोठून मिळत होता याबाबत अमेरिकन नागरिक अमेरिकेच्या एफटीसी (फेडरल ट्रेड कमिशन) कडून मिळालेल्या माहितीनुसार फसविल्या गेलेल्या अमेरिकन नागरिकांशी मेलद्वारे संपर्क साधला आहे. तसेच त्यांच्या इतर चार साथीदारांचा शोध घेण्यासाठी एक पथक रवाना करण्यात आले आहे. 

ही कारवाई अपर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे, सायबर व आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलिस आयुक्त नीलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन पवार, सहायक निरीक्षक सागर पानमंद, कर्मचारी अस्लम अत्तार, अजित कुर्‍हे, प्रसाद पोतदार, संतोष जाधव, नीलेश शेलार यांच्या पथकाने केली.