Thu, May 23, 2019 14:23
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › पिंपरीत टोळक्‍याकडून नागरिकांवर तलवारीने वार 

पिंपरीत टोळक्‍याकडून नागरिकांवर तलवारीने वार 

Published On: May 16 2018 7:42AM | Last Updated: May 16 2018 7:47AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत नेहरुनगर, विठ्ठलनगर झोपडपट्टी पुनर्वसन परिसरात टोळक्याने हातात नंग्या तलवारी, कोयते आणि दांडके घेऊन राडा केला. रस्त्याने जाणाऱ्यांवर हत्याराने वार करुन ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच रस्त्यावरील दहा ते १२ वाहनांची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मंगळवारी रात्री आकराच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या आलेल्या काही अज्ञात टोळक्यांनी हातात शस्त्रे घेवून दहशत माजवली. गणेश रामदास नेरकर (वय, ३२, रा. नेहरू टॉवर, नेहरूनगर पिंपरी) या तरुणावर कोयत्याने वार केले. यानंतर विठ्ठल नगर झोपडपट्टी पुनर्वसन येथे कामावरून घरी चाललेल्या संभाजी म्हस्के या तरुणावर देखील कोयत्याने वार केले. नेहरूनगर चौकात आणखी एकाला मारहाण केली. (नाव पत्ता समजू शकले नाही). नेहरूनगर येथील क्रांती चौक, संतोषी माता चौक, विठ्ठल नगर झोपडपट्टी पुनर्वसन इमारत या ठिकाणी रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षा, टेम्पो, कार अशा एकूण १० ते १२ वाहनांच्या काचा फोडून दहशत माजवली.

या घटनेची माहिती कळताच सहायक पोलिस आयुक्त सतीश पाटील, पिंपरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीधर जाधव, भोसरी चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र जाधव, सहायक पोलिस निरीक्षक दिंगबर सूर्यवंशी, पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब अंतरकर, मधुसूदन घुगे, विठ्ठल बडे आदी पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची चौकशी केली. पिंपरी पोलिस या घटनेची चौकशी करीत आहेत.

Tags : pimpri chinchwad, police, sword