Wed, Feb 20, 2019 06:32होमपेज › Pune › दिवसा घरे फोडणारा सराईत जेरबंद

दिवसा घरे फोडणारा सराईत जेरबंद

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

बंद फ्लॅट हेरून भरदिवसा घरफोड्या करणार्‍या सराईत गुन्हेगाराला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दिवसा फोडण्यात आलेले 12 गुन्हे उघडकीस आणत तब्बल 25 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याकडून शहरातील आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता असल्याची माहिती परिमंडल दोनचे उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे व वरिष्ठ निरीक्षक विष्णू जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. सुनील ऊर्फ सुशील बबन भोसले (वय 27, रा. रामनगर, पेरणेफाटा, भीमा कोरेगाव, मूळ अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. 

गेल्या काही दिवसांपासून घरफोड्या करणार्‍या गुन्हेगारांनी सिंहगड रोड परिसरात हैदोस घातला होता. विशेषकरून  दिवसा बंद फ्लॅट काही वेळातच फोडण्यात येत होते. काही महिन्यांत तब्बल 12 घरे फोडण्यात आली होती. त्यामुळे नागरिक हैराण झाले होते; तर  सिंहगड रोड पोलिसांना या घटना रोखण्याचे आव्हान दिले होते. दरम्यान या घटनांची वरिष्ठांनी गंभीर दखल चोरट्यांना शोधण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तसेच खबर्‍यांकडून माहिती गोळा केली. त्यात सुनील ऊर्फ सुशील भोसले घरफोड्या करत असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याचा माग काढला. तसेच, त्याला धायरी परिसरातून ताब्यात घेतले.

त्याची चौकशी केली. त्या वेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, सखोल तपास केल्यानंतर त्याने घरफोड्या केल्याचे सांगितले. त्याच्याकडून सिंहगड रोड परिसरातील भरदिवसा झालेल्या 12 घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आणत 24 लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले. सुनील ऊर्फ सुशील भोसले हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वीचे 10 गुन्हे दाखल आहेत. तो या गुन्ह्यांमध्ये कारागृहातून सुटून बाहेर आला आहे. ही कारवाई अप्पर पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे, वरिष्ठ निरीक्षक विष्णू जगताप, निरीक्षक बबन खोडदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील दत्ता सोनवणे, यशवंत ओंबसे, दयानंद तेलंगे-पाटील, संतोष सावंत, सचिन माळवे, राहुल शेडगे, वामन जाधव, शिवा कायगुडे, पुरुषोत्तम गुन्ला व मयूर शिंदे यांच्या पथकाने केली.