Mon, Jun 24, 2019 21:45होमपेज › Pune › रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू

रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू

Published On: Feb 08 2018 1:52AM | Last Updated: Feb 08 2018 12:53AMपिंपरी : प्रतिनिधी

लोहमार्ग ओलांडताना रेल्वेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू झाला. बुधवारी (दि.7) सकाळी सहाच्या सुमारास आकुर्डीतील पॉवर हाऊसजवळील लोहमार्गावर हा प्रकार उघडकीस आला.
बुधवारी सकाळी आकुर्डीजवळ लोहमार्गावर एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती चिंचवड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन यशवंतराव चव्हाण रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवला. लोहमार्ग ओलांडताना रेल्वेच्या धडकेने तिचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तिच्याकडे कोणत्याही स्वरूपाची कागदपत्रे न मिळाल्याने ओळख पटू शकली नाही. वय अंदाजे 35 वर्षे, उंची पाच फूट दोन इंच, बांधा मजबूत, नाक सरळ, चेहरा उभट, केसांचा बॉबकट, असे वर्णन असून, अंगात पोपटी रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला होता. या वर्णनाच्या महिलेबाबत माहिती असल्यास चिंचवड लोहमार्ग पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

घरफोडी करणारे सराईत निगडी पोलिसांच्या जाळ्यात

पिंपरी : चिंचवड येथील कृष्णानगर येथे पोलिस रात्री गस्त घालत असताना संशय आल्याने पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून चार गुन्हे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या तिघांकडून 3 लाख 1 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल निगडी पोलिसांनी जप्त केला आहे.

रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना कृष्णानगर येथील मेघमल्हार हौसिंग सोसायटीजवळ तीन संशयित इसम दिसून आले. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता, पोलिसांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेण्यात आले. सचिन गोरखनाथ काळे (40, निगडी), संतोष लालाजी पवार (30, आझाद चौक, निगडी), हमीद अंतुम शिंदे (25, गांधीनगर, देहूरोड) ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये 2 लाख 97 हजार किमतीचे सोन्याचे दागिने, 4 हजार 770 रुपये किमतीचे मसाले, रोख रक्कम असा एकूण 3 लाख 1 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत 
करण्यात आला. 

मोरवाडीत कामगाराचा अपघातात मृत्यू

पिंपरी : मोरवाडी चौकात एका कामगाराला अज्ञात वाहनाच्या धडकेत एका कामगाराचा मृत्यू झाला. काम संपवून दुचाकीवरून घरी निघालेल्या कामगाराचा धडकेमध्ये जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.7) दुपारी चारच्या सुमारास मोरवाडी येथे ग्रेडसेपरेटरमध्ये घडली.

सुनील नारायण जाधव (47, रा.  बालाजीनगर, धनकवडी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. जाधव हे देहूरोड सेंट्रल ऑर्डनन्स डेपोमध्ये कामाला होते. जाधव बुधवारी दुपारी दुचाकीवरून घरी जात होते. मोरवाडीतील ग्रेडसेपरेटरमध्ये त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

खराळवाडीत एकाची आत्महत्या

पिंपरी : खराळवाडीतील एका व्यक्तीने आजाराला कंटाळून आत्महत्या केली. आजारपण आणि बेरोजगार असल्याने आलेल्या नैराश्यातून एकाने राहत्या घरी पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना खराळवाडीत बुधवारी (दि.7) सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली. नारायण रामचंद्र ढमाले (48, रा. ए. जे. चेंबर्स, खराळवाडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. नारायण ढमाले गेल्या तीन वर्षांपासून बेरोजगार होते. त्यातच त्यांना आजाराने ग्रासल्याने आलेल्या नैराश्यातून बुधवारी घरात कोणी नसताना नॉयलॉनच्या दोरीने पंख्याला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. पिंपरी पोलिस अधिक तपास करत आहेत.