होमपेज › Pune › सराईत गुन्हेगार सोन्या काळभोरसह चौघांना अटक

सराईत गुन्हेगार सोन्या काळभोरसह चौघांना अटक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

वर्चस्वाच्या वादातून रावेत, आकुर्डी परिसरात नव्याने उदयास आलेल्या रावण सेना टोळीचा प्रमुख अनिकेत जाधव याचा खून करून पसार झालेल्या काळभोर टोळीच्या प्रमुखासह चौघांना निगडी पोलिसांनी रविवारी मध्यरात्री लोणावळा परिसरातून अटक केली आहे.

विवेक सोपान काळभोर उर्फ सोन्या, दत्ता काळभोर, जीवन अंगराज सोनवणे आणि अमित उर्फ बाबा फ्रान्सिस या चौघांना अटक केली आहे.

अनिकेत जाधव याच्यावर तलवारीने वार करून तसेच डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून करण्यात आलेला होता. हा खून टोळीच्या वर्चस्वातून आकुर्डी येथे एक आठवड्यापूर्वी सोमवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास झाला.

खून झालेल्या अनिकेत याच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. एक महिन्यापूर्वी रमाबाई वसाहत आकुर्डी येथे महाकाली टोळीचा प्रमुख हनम्या शिंदे याच्यावर गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न अनिकेत व त्याच्या साथीदाराने केला होता. या प्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून तो त्यामध्ये फरार होता. 

सोमवारी रात्री त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. यामध्ये महाकाली टोळीचा प्रमुख हनम्या शिंदे आणि त्याच्या इतर चार साथीदारांना यापूर्वीच अटक केली आहे. सोन्या काळभोर आणि इतरांची माहिती निगडीचे वरिष्ठ निरीक्षक विजय पळसुले, शंकर अवताडे, तपासी पथकाचे संदीप पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार तपासी पथकाचे अधिकारी, कर्मचारी किशोर पदेर, विलास केकान, प्रसाद कलाटे, किरण खेडकर, रमेश मावस्कर, धर्मा अहिवळे या पथकाने मळवळी परिसरातून सापळा रचून अटक केली.