Sun, Aug 18, 2019 15:15होमपेज › Pune › गुन्हे शाखा गाढ झोपेतच!

गुन्हे शाखा गाढ झोपेतच!

Published On: Apr 16 2018 1:43AM | Last Updated: Apr 16 2018 1:23AMपुणे : अक्षय फाटक

पोलिस दलातील गुन्हेशाखेचा काही वर्षांपूर्वी असलेला दरारा पाहता भल्या-भल्यांना घाम फुटायचा. नाव ऐकताच अट्टल गुन्हेगारांची पळता भुई थोडी व्हायची...पण सध्या या गुन्हे शाखेला आता ‘कडक’ उन्हातही गाढ झोप लागली आहे.  सुस्त असलेल्या ‘क्राईम ब्रँच’ला  कुणी तरी जागा करा हो... अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. विशेष म्हणजे, चालू वर्षातील तीन महिन्यात तब्बल 200 घरफोड्यांच्या घटना घडल्या असून या तपासात विशेष गती नाही. सध्या वाढत्या घरफोड्यांच्या पार्श्‍वभूमीवर गुन्हे शाखेने नव्या दमाने कामाला लागून आपला पूर्वीचा दरारा दाखवून देण्याची  गरज असल्याची चर्चा खुद्द पोलिस दलातही सुरू आहे. 

पुणे पोलिस आयुक्‍तालयाअतंर्गत पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण 39 पोलिस ठाणे आहेत. तर, गुन्हे शाखेची पाच युनिटस् आहेत. अमली पदार्थ विरोधी पथक तसेच खंडणी व दरोडा विरोधी पथके आहेत. तर, वेगवेगळी अशी एकूण 17 पथक आहेत. स्थानिक पोलिसांना ठाण्यातील कामकाज व दररोजचा बंदोबस्त, किरकोळ घटनांमुळे गुन्हे उघडकीस आण्यास मर्यादा पडतात. गुन्हे शाखा ही शहरातील वाढता ‘स्ट्रीट क्राईम’ (भर रस्त्यावरील गुन्हे) रोखणे, घरफोड्या करणारे आणि बड्या गुंडांवरील ‘रामबाण’ उपाय म्हणून ओळखली जाते. काही वर्षांपूर्वी पुण्याच्या गुन्हे शाखेचे नाव ऐकताच भल्या-भल्यांना घाम फुटायचा. स्व-कर्तृत्वाने राज्यभर या गुन्हे शाखेने वेगळा ठसा उमटवला होता. पण, आता हीच गुन्हे शाखा तळपत्या उन्हात स्तुस्त झोपल्याचे पहायला मिळत आहे. 

घरफोड्या करणार्‍यांनी पुणे शहरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. तर, लुटमारीचेही गुन्हे काही कमी नाहीत. बिबवेवाडी-कोंढवा रोडवर पेट्रोल पंपावरील 27 लाखांची रोकड दोघांनी भरदिवसा  लुटली. त्यापूर्वी गेल्या वर्षात कात्रज बायपास रोडवरही वारकरून पेट्रोल पंपाची 25 लाखांची रोकड लुटण्यात आली. स्थानिक पोलिसांसह गन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळांना भेट दिली. 

चोरट्यांचा माग काढला. पण, हाती काहीच नाही. त्या उलट अलंकार, हडपसर, पिंपरी, निगडी पोलिसांनी सराईतांना पकडून गुन्हे उघड के ले. पण, गुन्हे शाखेचे हात रिकामेच. नुसत्या नावाला उरलेल्या आणि एखाद्या युनिटच्या कामगिरीवर जिवंत असणार्‍या गुन्हे शाखेला आता तरी खडबडून जागे करा, अशीच म्हणण्याची वेळ आली आहे. 

तपासाचे प्रमाण अत्यल्प

शहरात 2016 मध्ये 1 हजार 132 घरफोड्या झाल्या. त्यात 18 कोटी 74 लाखांचा ऐवज चोरीला गेला. त्यापैकी 542 गुन्हे उघडकीस आणत, तीन कोटी 72 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तर, 2017 मध्ये घरफोड्यांमध्ये थोडी घट झाली. 1 हजार चार घरफोडीचे गुन्हे घडले. त्यामध्ये 14 कोटी 56 लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला. यापैकी 536 गुन्हे उघडकीस आले असून, तीन कोटी 64 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच चालू वर्षात (2018) तीन महिन्यात 200 घरफोड्या झाल्या असून, त्यात तीन कोटींच्या जवळपास माल चोरीला गेला आहे. 

फक्‍त लाखांच्या घरफोड्यांचा बोलबाला...

एक लाखाच्या वरील व पाच लाखांपुढील घरफोडी अशी वर्गवारी पोलिसांनी केली आहे. त्यानुसार आरोपींचा माग काढला जात आहे. पण, पोलिसांना अद्यापही या चोरट्यांचा माग निघालेला नाही. याबाबत गुन्हे शाखेच्या एका अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, जवळपास रेकॉर्डवरील गुन्हेगार पकडले आहेत. पण, घरफोडीत आता नवीन गुन्हेगारांची टोळी सक्रिय झाली आहे. त्यामुळे या घटना उघडकीस येण्यास अडचणी येत आहेत. 

Tags : pune, pune news, crime branch issue,