Thu, Jun 04, 2020 06:31



होमपेज › Pune › बारामती पोलिसांना मारहाण, १९ जणांविरोधात गुन्हा

बारामती पोलिसांना मारहाण, १९ जणांविरोधात गुन्हा

Last Updated: Mar 28 2020 4:19PM




बारामती : पुढारी वृत्तसेवा

शहरातील जळोची भागात शुक्रवारी (दि. २७) शहर पोलिस ठाण्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाण प्रकरणी एकूण १९ जणांविरोधात प्राणघातक हल्ल्यासह सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण, सरकारी कामकाजात अडथळा आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये दहा महिलांचा समावेश आहे.

पोलिस कर्मचारी पोपट बुधा कोकाटे यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपींविरोधात प्राणघातक हल्ला, सरकारी कर्मचाऱयाला मारहाण, सरकारी कामकाजात अडथळा, रोग प्रतिबंध अधिनियम, महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये ज्ञानेश्वर बाबुराव वाकुडे, अंकुश बाबुराव वाकुडे,  अक्षय हिंदूराव ढवळे, अश्विनी अशोक ढवळे, वृषाली किशोर ढवळे, वर्षा अर्जुन ढवळे, हिरकणी हिम्मत ढवळे, चांदणी अंकुश वाकुडे, मंगल बाबुराव वाकुडे, आशा मोहन गोंडे, माया दयावंत ढवळे, जया हिंदुराव ढवळे, विजय हिंदुराव ढवळे, अर्जुन हिम्मत ढवळे, किशोर हिम्मत ढवळे, चेतन अरूण साळुंखे, हिंदूराव जयराम ढवळे,  हिम्मत जयराम ढवळे, साकाबाई हिम्मत ढवळे व  गौरव अरूण साळुंखे  (रा. जळोची,  बारामती) यांचा समावेश आहे.

शुक्रवारी झालेल्या या घटनेत शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक औदुंबर पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी शेंडगे, उपनिरीक्षक पद्मराज गंपले, योगेश शेलार, महिला पोलिस स्वाती काजळे, रचना काळे, पोपट कोकाटे, सिद्धेश पाटील, पोपट नाळे व होमगार्ड धायगुडे असे दहाजण जखमी झाले होते. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जळोचीमधील जोशीवाडा येथे पुणे, मुंबई, कोल्हापूर येथून आलेल्या काहींच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला होता. परंतु त्यातील काही लोक बाहेर बिनधास्त फिरत असल्याच्या कारणावरून जळोळीतील स्थानिक लोक व जोशी समाजाच्या लोकांमध्ये मारामारी सुरु होती. त्यामुळे पोलिसांनी तिकडे धाव घेतली होती. ही मारामारी सोडवून त्यातील काहींना ताब्यात घेत पोलिस सरकारी वाहनाने पोलिस ठाण्याकडे येत होते. त्यावेळी अचानक आरोपींनी सरकारी वाहनासमोर हातात दांडके, दगड, वीटा घेवून येत वाहन थांबवत आमच्या लोकांना कोठे घेवून चालला असे म्हणत गाडी थांबवली. पोलिस अधिकारी-कर्मचारी यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. सरकारी वाहनात बसलेले अक्षय हिंदुराव ढवळे, विजय हिंदुराव ढवळे, अर्जुन ढवळे किशोर ढवळे यांना सरकारी वाहनातून उतरवले. पुन्हा त्या सर्वांनी मिळून पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर लाकडी दांडके, दगड, विटा यांनी हल्ला केला. त्यानंतर ताब्यात घेतलेले अक्षय हिंदुराव ढवळे व इतर तेथून पळून गेले. पोलिसांनी अधिकची कुमक मागवत बळाचा वापर करुन पोलिसांवर हल्ला करणाऱया, दंगा करणाऱ्यांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणण्यात आले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन शिंदे अधिक तपास करत आहेत.