Tue, Dec 10, 2019 13:08होमपेज › Pune › वाहनांवर न्यायाधीश लिहिण्यासही मनाई

वाहनांवर न्यायाधीश लिहिण्यासही मनाई

Published On: Jun 26 2019 5:35PM | Last Updated: Jun 26 2019 5:33PM
पुणे : प्रतिनिधी 

न्यायिक सेवेत असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या गाड्यांवर न्यायाधीश असे लिहू नये असा सक्त आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक एस. पी. तावडे यांनी काढला. यापूर्वी १ जून २०१० रोजी असा आदेश काढण्यात आला होता. नंतर १४ फेब्रुवारी २०११ रोजी पुर्नआदेश काढण्यात आला. तरीही काही गाड्यांवर न्यायाधीश असे लिहिलेले आढळून आल्याने पुन्हा हा आदेश २५ जून २०१९ रोजी काढण्यात आला.

हा आदेश महाराष्ट्रातील सर्व दिवाणी, फौजदारी, लघुवाद, मुंबईतील मेट्रोपोलिटन व जिल्हा न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय तसेच सहकार न्यायालय, औद्योगिक न्यायाधिकरण, धर्मादाय आयुक्तांचे आस्थापनेतील सर्व अधिकारी व वाहन अपघात न्यायाधिकरणातील न्यायाधीशांनाही लागू होणार आहे. 

त्यामुळे न्यायाधीश शब्दा ऐवजी जज्ज, मॅजिस्ट्रेट, मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट अथवा तत्सम समानार्थी शब्द गाड्यांच्या काचांवर प्रदर्शित करता येणार नाहीत. या निर्देशांचे सक्त अंमलबजावणी होण्यासाठी सर्व प्रमुख जिल्हा न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश त्याचप्रमाणे सहकार, औद्योगिक व वाहन अपघात न्यायाधिकरणांचे अध्यक्ष व राज्याच्या धर्मादाय आयुक्तांना वरील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे न्यायासाठी असा उल्लेख चारचाकी गाड्यांच्या काचांवरून तसेच दुचाकी वाहनांवरून काढावे लागतील.