होमपेज › Pune › ओला कचरा खाणारी बांबूची टोपली

ओला कचरा खाणारी बांबूची टोपली

Published On: Apr 20 2018 1:16AM | Last Updated: Apr 20 2018 12:27AMपुणे : प्रतिनिधी

घरातील भाजीपाल्याचा कचरा व इतर ओला कचरा एक मोठी समस्या झाली आहे. अनेकदा या ओल्या कचर्‍यामुळे घरात दुर्गंधी पसरते. मात्र या अशा ओल्या कचर्‍यापासून सुटका करण्यासाठी पुण्यातील दाम्पत्याने नावीन्यपूर्ण पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी ओला कचरा खाणारी बांबूच्या टोपलीची निर्मिती केली आहे. या टोपलीत जीवाणूंचे विरजण घातलेले असल्यामुळे या टोपलीत लगेच कचरा टाकायला सुरुवात करता येते. टोपलीत कचर्‍याचे विघटन लगेच सुरू होते, तसेच त्याची दुर्गंधी तर येत नाहीच, पण दोन महिन्यांनी खत मिळायलाही सुरुवात होते. 

पर्यावरणविषयक जागृती घडविण्याच्या उद्देशातून तसेच घरातील ओला कचरा घरातच जिरविण्याच्या हेतूने सॉफ्टवेअर मॅनेजर असलेले मयूर भावे व त्यांच्या पत्नी सुजाता भावे यांनी ही ओला कचरा खाणारी बांबूची टोपली तयार केली आहे. या बांबूच्या टोपलीमध्ये चार ते पाच जणांच्या कुटुंबाचा कचरा आरामात जिरतो. गंमत म्हणजे ही टोपली कधीच भरून वाहत नाही. या टोपलीमध्ये स्वयंपाकघरातील सर्व कापलेल्या भाज्यांचे देठ, फळांची साले, ताटातील खरकटे, चहाचा चोथा, निर्माल्याची फुले, अंड्याची टरफले आणि वाळलेली पानेसुद्धा टाकू शकतो. टोपलीला भरपूर छिद्रे असल्याने याची अजिबात दुर्गंधी येत नाही. ओला कचरा आपोआप जिरला जातो आणि या टोपलीमध्ये असलेल्या विरजणामुळे त्याचे रूपांतर खतामध्ये होते. सध्याच्या प्लास्टिक बंदीच्या काळात बांबूची टोपली पर्यावरणपूरक आहे, असे मयूर भावे यांनी सांगितले. भावे दाम्पत्यांनी स्वत:च्या घरातील कचरा मागील बारा वर्षांपासून घरातच जिरविला आहे.

या टोपलीबाबत  व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, फेसबुकच्या माध्यमातून अनेकजण प्रचार करत आहेत. भावे यांच्या टोपलीला पुण्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. बाहेरगावाहूनही  त्यांना या टोपलीबाबत विचारणा होत आहे. कचर्‍याचा प्रश्न भीषण झाला तर त्यासाठी ही टोपली उत्तम पर्याय आहे. प्लास्टिक बंदीच्या काळात बांबूची टोपली अगदी पर्यावरण पूरक आहे, असे भावे यांनी सांगितले.