Wed, Apr 24, 2019 15:33होमपेज › Pune › राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत राडा; प्रक्रिया स्थगित

राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत राडा; प्रक्रिया स्थगित

Published On: Mar 19 2018 3:01PM | Last Updated: Mar 19 2018 3:01PMपुणे : प्रतिनिधी 
राज्य सहकारी संघाच्या पदाधिकारी निवडणुकीत सोमवारी सकाळी राडा झाला. बहुमत आपल्याकडेच असल्याच्या वादातून खुर्च्या, टेबलं पाड्ण्यात आली. निवडणूक प्रक्रियेमध्ये गोंधळ झाल्याने सहकार विभागाने निवडणूक स्थगित केली आहे.  निवडणूक प्रक्रिया दरम्यान एका कार्यकर्त्याने  रिव्हॉल्व्हर दाखवल्याने निवडणुकीस गालबोट लागले आहे. या प्रकाराबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली असून,  गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मानद सचिव या पदांसाठी निवडणूक प्रक्रिया सोमवारी सकाळी सहकार संघ्याच्याच कार्यालयात सुरू असताना दोन्ही गटांनी गोंधळ घातला. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने  निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली असल्याचे पत्र सहकार विभागाचे उपनिबंधक आणि निवडणूक निर्णय अधिकारी  आनंद कटके यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे पाठविले आहे.

मुंबई सहकारी बँकेचे विद्यमान संचालक नितीन बनकर यांना अमोल घुले यांनी  रिव्हॉल्व्हर दाखवण्याचा आरोप आमदार प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला. महिला प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष आणि या संस्थेच्या विद्यमान संचालिका विद्या पाटील, तसेच  विद्यमान संचालिका सुनीता माळी यांनी आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी निवडणूक प्रक्रियेच्या ठिकाणी येऊन गोंधळ घातला, असा आरोप पत्रकारांशी केला.

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या सभागृहामध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू होती. त्याठिकाणी खुर्च्या आणि टेबल तोडण्यात आले आहेत. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनल आणि संजीव कुसाळकर यांचे परिवर्तन पॅनल यांच्यात निवडणूक झाली होती. दरेकर हे या संस्थेच्या  मावळत्या कार्यकारिणीचे संचालक आहेत. दोन्ही पॅनेलने आपल्याकडेच बहुमत असल्याचा दावा केल्यावरून हा प्रकार घडला.

Tags : cooperative department, Maharashtra, rajya sahakari sangh, Praveen Darekar, BJP, violence, violence in rajya sahakari sangh meeting