होमपेज › Pune › प्राण्यांसाठी फॉगर आणि कुलर सिस्टिम (Video)

प्राण्यांसाठी फॉगर आणि कुलर सिस्टिम (Video)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





पुणे : प्रतिनिधी

कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात प्राण्यांना उकाड्याचा त्रास होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात आल्या आहे. त्यामुळे आता हे प्राणिसंग्रहालयाला ठंडा ठंडा कुल कुल झाले आहे असेच म्हणावे लागेल. राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात सुमारे 63 प्रजातींचे 420 प्राणी आहेत. त्यामध्ये सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी, पक्षी यांचा समावेश होतो. त्यांना पाहण्यासाठी पुण्यासह अन्य भागातील अनेक पर्यटक येत असतात. 

प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनामार्फत प्राण्यांची देखभाल निगा राखण्याचे काम केले जाते. उन्हाळ्यात तापमान 40 अंश डिग्रीच्या वर जाते, तेव्हा संग्रहालयातील वाघ, सिंह, बिबट्या, अस्वल, हत्ती यांसारख्या प्राण्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे या प्राण्यांच्या रात्रनिवार्‍यामध्ये कुलर आणि फॉगरची व्यवस्था केली असल्याचे राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव यांनी सांगितले.  

यावेळी जाधव म्हणाले, सरपटणार्‍या प्राण्यांसाठी सुध्दा फॉगरची व्यवस्था करण्यात आली आहे. हत्तीला दिवसातून दोन-तीन वेळा थंड पाण्याने अंघोळ घालण्यात येते. संग्रहालयातील हरीण वर्गातील तृणभक्षक प्राण्यांच्या खंदकाभोवती थंड पाण्याचे स्प्रिंगल फिरत असतात. त्या स्प्रिंगलमुळे परिसरात हिरवळ कायम राहण्यास मदत होते. तसेच खंदकाभोवतीचे  तापमान देखील थंड राहण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या सुटीत उद्यानास भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या वाढते. लहान मुलांनाही पाण्यात पहूडलेला वाघ पाहण्याची मजा वाटते.

पर्यटकांनी प्राणिसंग्रहालयात आल्यानंतर प्राणिसंग्रहालयाचे नियम पाळणे बंधनकारक आहे. संग्रहालयातील नियमांचे फलक प्राणिसंग्रहालयात ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत. त्या नियमांचे पालन करण्यात यावे, असेदेखील प्राणिसंग्रहालय प्रशासनकडून सूचित करण्यात आले आहे. वन्यजीवांना इजा अथवा त्रास देऊ नये. वन्यजीव संरक्षण कायद्याचे कलम 38 जे नुसार वन्यजीवांना त्रास देणे, हा गुन्हा असून त्यानुसार गुन्हा करणार्‍यास सहा महिने कारावास आणि दोन हजार रुपये दंड अशी तरतूद केली आहे.

Tags :  cooling,  animals, katra,  Zoo Park,  pune






  •