Tue, Jul 23, 2019 06:46होमपेज › Pune › पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आघाडीआधी बिघाडीची ठिणगी

पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आघाडीआधी बिघाडीची ठिणगी

Published On: Apr 12 2018 5:52PM | Last Updated: Apr 12 2018 5:52PMपुणे : पांडुरंग सांडभोर

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीची चर्चा सुरू होण्याआधीच त्यांच्यात बिघाडीची ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादीने पुणे लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे. काँग्रेस ही जागा सहजासहजी सोडणार नसल्याचे स्पष्ट आहे, त्यामुळे पुण्याची जागा आघाडीत कळीचा मुद्दा ठरणार आहे. 

पुण्यातील हल्लाबोल मोर्चात बोलताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुणे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे. त्यामुळे काँग्रेसबरोबर आघाडी झाली तरी राष्ट्रवादी ही जागा लढवेल अशी घोषणा केली. त्यामुळे एकीकडे वर्षभरावर येऊन ठेपलेल्या निवडणुकींसाठी आघाडीची गणितांची जुळवाजुळव सुरू असतानाच पवार यांच्या घोषणेमुळे त्यात व्यत्यय येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. 

काँग्रेसमधून १९९९ मध्ये बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली. त्यानंतर झालेली पहिल्या लोकसभा निवडणूक दोन्ही कॉंग्रेसने स्वतंत्रपणे लढविली. या निवडणूकीत दोन्ही कॉंग्रेसमध्ये मतांचे विभाजन होऊन भाजपचे प्रदीप रावत, खासदार म्हणून निवडून आले. हा धडा घेऊन पुढे २००४ ची लोकसभा निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र लढविली. तेव्हापासून पुणे लोकसभेची जागा काँग्रेसकडेच आहे.  विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यात लोकसभेचे चार मतदारसंघ येतात, त्यामधील बारामती, शिरुर आणि मावळ हे तीनही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. केवळ पुण्याची एकमेव जागा काँग्रेसकडे आहे. २००४ ते २०१४ या कालावधीत सुरेश कलमाडी हे पुण्याचे कॉंग्रेसचे खासदार होते. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसचा पराभव झाला आणि भाजपने ही जागा जिंकली. 
मात्र गेली जवळपास पंधरा वर्षे पुणे लोकसभेची जागा काँग्रेसकडे असली तरी पुण्यातील काँग्रेसचा जनाधार कमी होत गेला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा आलेख वाढत गेला. २००२ च्या पालिका निवडणूकीत काँग्रेसचे संख्याबळ ६१ इतके होते. त्यानंतर २००७ ला ३६ इतके झाले, पुढे २०१२ ला २८ आणि २०१७ ला १० वर आले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मात्र वाढत गेले आहे. २००२ च्या राष्ट्रवादीचे २२ नगरसेवक होते. २००७ ला ते ४८, २०१२ ला ५२ आणि आता २०१७ च्या निवडणूकीत ४१ असे राष्ट्रवादीचे संख्याबळ आहे.  त्यामुळे साहजकिच काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीचे ताकद जास्त असल्याचे पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादीने हक्क सांगणे चुकीचे ठरणार नाही. मात्र काँग्रेस हक्काची जागा इतक्या सहजासहजी सोडणार का असाही प्रश्‍न आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम करीत आहे. साहजिकच आगामी निवडणूकीसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी होणार असल्याचे स्पष्ट आहे. मात्र, त्यासाठीच्या चर्चेत राष्ट्रवादीने पुण्याच्या जागेचा आग्रह धरल्यास आघाडीत ही जागा कळीचा मुद्दा ठरू शकतो. विशेष म्हणजे ही जागा काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्यास पुणे जिल्ह्यातही लोकसभेची एकही जागा काँग्रेसकडे राहणार नसल्याचे काँग्रेस हद्दपार होण्याची भिती काँग्रेस जणांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

भंडारा- गोंदियाच्या बदल्यात पुण्याची जागा ?

पुण्याची जागेवर राष्ट्रवादीने दाव्या सांगण्यामागे भंडारा- गोंदियाची जागा काँग्रेसला सोडण्याचे राजकीय गणित असल्याची चर्चा आहे. सद्यस्थितीला भंडारा-गोदिंया लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी या जागेवरून निवडणूक लढविली होती मात्र, या मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर निवडून आलेले खासदार नाना पटोले पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे पटोलेंसाठी राष्ट्रवादीला ही जागा पुन्हा काँग्रेसला सोडावी लागू शकते. त्यामुळे त्याबदल्यात पुण्याची जागा पदरात पाडू घेण्याची राष्ट्रवादीची खेळी असल्याचे सांगण्यात येत आहे.    
दोन्ही काँग्रेसकडे उमेदवारांची वाणवा

आगामी लोकसभा निवडणूकीत पुण्याची जागा आता नक्की कोणाकडे जाईल हे स्पष्ट नाही. मात्र दुर्देवाने दोन्ही काँग्रेसकडे प्रभावी उमेदवारच नाही ही वस्तुस्थिती आहे. गत निवडणूकीत विश्‍वजीत कदम हे काँग्रेसचे उमेदवार होते, आता ते वडिलांच्या जागेवर पोटनिवडणूक लढवतील असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेसकडे सक्षम असा मनी आणि मसल पावर असलेला चेहरा नाही. हिच अवस्था राष्ट्रवादीची आहे. संपूर्ण शहराच्या पातळीवर प्रतिमा असलेला उमेदवाराची राष्ट्रवादीकडे वाणवा आहे. राज्यसभेच्या खासदार ॲड. वंदना चव्हाण हा एकमेव पर्याय राष्ट्रवादीकडे असू शकतो, मात्र, निवडणूक लढविण्यासाठी ज्या काही अन्य सामुग्री लागते ती ॲड. चव्हाण यांच्याकडे नाही हेही वास्तव आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसची कमजोरीसाठी भाजपसाठी ही मोठी जमेची बाजुची आहे.