Tue, Apr 23, 2019 10:00होमपेज › Pune › पुणे : पालिकेत भाजपने भ्रष्टाचाराच्या सीमा ओलांडल्या

पुणे : पालिकेत भाजपने भ्रष्टाचाराच्या सीमा ओलांडल्या

Published On: Feb 08 2018 5:16PM | Last Updated: Feb 08 2018 5:16PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत भाजपने भ्रष्टाचाराच्या सीमा ओलांडल्या आहेत. सत्तेचा सर्वाधित उपभोग कोण घेतो यासाठी त्यांच्यात स्पर्धा व सावळा गोंधळ सुरू असल्याने ही महापालिका बरखास्त करावी अशी मागणी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी आज पत्रकार परिषेदेत केली.

कॉंग्रेसच्या वतीने आयोजित या पत्रकार परिषदेस महिला कॉंग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, माजी महापौर कवीचंद भाट, विष्णू नेवाळे, संग्राम तावडे, गौतम आरखडे, मयूर जैसवाल, नरेंद्र बनसोडे, राजेंद्रसिंह वालीया आदी उपस्थित होते. 

साठे म्हणाले की, पालिकेत भाजपची सत्ता येवून एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र त्यांची कामाची दिशा पाहून जनतेची दशा झाली आहे. भाजपने पालिकेत भ्रष्टाचाराच्या सीमा ओलांडल्या आहेत. त्यांच्या स्वपक्षीय खासदारानेच याबाबत नाराजी व्यक्त केल्याने विरोधकांनी बोलण्याची गरज उरली नाही. राष्ट्रवादी भ्रष्टवादी असल्याचा आरोप करणारे आणि आम्ही सत्तेवर आल्यानंतर त्यांना आत टाकू, अशी भाषा करणार्‍या भाजपने त्यांना आत घेतले आहे. भ्रष्टाचाराची चौकशी झाली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना क्लिनचिट देणार हे निश्‍चित आहे. त्यापेक्षा ही महापालिका बरखास्त करावी अशी मागणी साठे यांनी केली.

महापालिकेत एवढा भ्रष्टाचार सुरू असताना शिवसेनेची भूमिका अतिशय संशयास्पद आहे. त्यांचा चोरीला आक्षेप आहे की चोरीच्या वाट्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. हे समजत नाही. भाजपमध्ये त्यांच्याच लोकप्रतिनिधींना किंमत नाही. नाना पटोले यांना बाहेर पडावे लागले. पिंपरी पालिकेत एका नगरसेवकाला अनधिकृत फ्लेक्सच्या विरोधात पालिकेत आंदोलन करण्याची वेळ आली. याची आठवण साठे यांनी करून दिली. मेट्रो सारखे पुर्वीच्याच सरकारने केलेली कामे आपण केल्याचे भाजप दाखवत आहे. मात्र मेट्रो निगडीपर्यंत न्यायची की पिंपरीपर्यंत याबाबत त्यांच्यातच मेळ नाही. आमदार मेट्रो निगडीपर्यंत होणार असे सांगतात, तर पालकमंत्री पिंपरीपर्यंत मेट्रो होईल असे सांगतात कोणाचाच कोणासही मेळ नाही असे साठे म्हणाले.

अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना पक्षपातीपणा केला जात आहे. असा आरोप साठे यांनी केला. पिंपरीतून महापालिकेची निवडणूक लढविलेल्या भाजपच्या विशालनगर येथील वॉईन शॉपवर कारवाई का होत नाही असा सवाल साठे यांनी केला. महपालिका आयुक्तांचे अस्तित्व जाणवत नसल्याची टिका त्यांनी केली.  

यावेळी साठे यांनी पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी म्हणून पृथ्वीराज साठे, संग्राम तावडे, शानी नौशाद यांची तर ब्लॉक अध्यक्ष पदी विष्णू नेवाळे (भोसरी), बाळासाहेब साळुंखे (पिंपरी), व परशुराम गुंजाळ (चिंचवड) यांची निवड झाल्याचे सांगितले.