Thu, Mar 21, 2019 23:57
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › मोफत आरोग्य शिबिरांचा भूलभुलैया

मोफत आरोग्य शिबिरांचा भूलभुलैया

Published On: Jul 20 2018 1:12AM | Last Updated: Jul 20 2018 1:12AMपुणे : प्रतिनिधी

एका बहुमजली इमारत असलेल्या रुग्णालयाने जवळील गरीब लोकवस्तीत वृद्धापकाळातील समस्यांबाबत वृद्धांसाठी एका मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले. शिबिरात 60 वर्षाच्या आजोबांनी प्राथमिक तपासणी करून घेतली असता त्यांना शिबिरातील डॉक्टरांनी हृदयविकाराची शक्यता वाटते म्हणून अँजिओग्राफी करण्यासाठी त्यांच्या रुग्णालयात अ‍ॅडमिट होण्यास सांगितले. अँजिओग्राफी केल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा कोणताही धोका नसल्याचे समोर आले, पण त्याची किंमत त्यांना दहा हजार रुपये इतकी मोजावी लागली. अशा प्रकारे या मोफत शिबिराद्वारे रुग्णालयांकडून रुग्णांचा खिसा कापला जात आहे. 

मोफत रोगनिदान शिबिर, वृद्धांसाठी, बालकांसाठी मोफत अमूक तपासण्यांवर सूट असा गाजावाजा करत सध्या खासगी रुग्णालयांकडून शिबिरांचे आयोजन रुग्णालयांत किंवा लोकवस्तींमध्ये केले जात आहे. मात्र, या शिबिरातून ‘बकरे’ मिळविणे हाच उद्देश असल्याचे समोर येत आहे. हे शिबिरे जरी मोफत असली तरी त्यातील काही रुग्णांना एखादा आजार असल्याची भीती घालून त्यांना महागड्या तपासण्या करायला लावणे आणि त्याद्वारे पैसे कमविणे हे उद्योग बिनादिक्‍कत सुरू आहेत. विशेषतः नवनवीन रुग्णालयांकडून हे ‘फंडे’ सध्या अजमावण्यात येत आहेत. यामध्ये त्यांना नवीन रुग्णरूपी बकर्‍यांसह रुग्णालयाचे मार्केटिंग, असा दुहेरी फायदा होत असल्याची माहिती रुग्णालयांतील डॉक्टर देतात.  

अनेक सामाजिक संस्था, समाजसेवक  यांनाही हाताशी धरून रुग्णालयांकडून शिबिराद्वारे अनेक रुग्णांना जाळ्यात ओढले जात आहे. पण सर्वच संस्था व सामाजसेवक असे नसून काहीजण तळमळीनेही या शिबिरांचे आयोजन करताना दिसतात. अशा वेळी रुग्णांना जर तपासण्या सांगितल्या किंवा ऑपरेशन सांगितले तर त्यांनी दुसर्‍या डॉक्टरांचे मत घेणे आवशक आहे. शहरातील एका प्रसिध्द रुग्णालयाने काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. त्यामध्ये पालिकेचा एक अधिकारीही तपासणी करण्यासाठी गेला होता. मोफत असल्यामुळे संबंधित अधिकार्‍यानेही सोबत काही पैसे घेतले नव्हते. पण, त्याला अँजिओग्राफी करायला सांगितली आणि त्याचे 12 हजार रुपये बिल लावले. पण, संबंधित अधिकार्‍याने हे पैसे देण्यास नकार दिला. मात्र, पैशांसाठी रुग्णालयाने त्यांना चार ते पाच तास डांबून ठेवले. अखेर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी तेथे फोन केल्यानंतरच त्यांची तेथून सुटका होऊ शकली, हे सर्वश्रुत आहे.