Sun, Mar 24, 2019 04:10होमपेज › Pune › ‘विकास पाहायचाय; तर बारामतीला या’ 

‘विकास पाहायचाय; तर बारामतीला या’ 

Published On: Jun 23 2018 7:33AM | Last Updated: Jun 23 2018 7:33AMबारामती : प्रतिनिधी

कृषी क्षेत्रातील विकासाशिवाय देश पुढे जाऊ शकणार नाही. कृषी क्षेत्रासह ग्रामीण विकास पाहायचा असेल तर संसदेतील प्रत्येक खासदाराने बारामतीला भेट द्यायला हवी, असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.

शुक्रवारी (दि. 22) बारामतीच्या दौर्‍यावर आलेल्या उपराष्ट्रपती नायडू यांनी विद्या प्रतिष्ठानमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, खा. सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच उपराष्ट्रपती नायडू यांनीही बारामतीच्या विकासाचे कौतुक करत खा. पवार यांनी या परिसरात केलेल्या कामाबद्दल गौरवोद‍्गार काढले. पवार यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात या परिसराचा चेहरामोहरा बदलला असल्याचे दिसते. येथे येण्यापूर्वी माझ्या मनात जी भावना होती, ग्रामीण विकासाचे जे चित्र होते, ते हुबेहुब येथे पाहायला  मिळाले. त्यामुळे बारामती दौर्‍यामुळे आनंदी असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले. अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित कृषी विज्ञान केंद्राचेही नायडू यांनी कौतुक केले. येथील शिक्षण संस्थाही उत्तम दर्जाचे विद्यार्थी घडवत असल्याचे ते म्हणाले.  देशभर असा प्रयोग राबविला जावा यासाठी प्रयत्नशील राहू असे ते म्हणाले. देशभरातील कृषी विज्ञान केंद्रांनी एकदा बारामतीला येऊन येथील केंद्र पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

खा. पवार यांच्याशी असलेल्या मैत्रीच्या संबंधांनाही उपराष्ट्रपतींनी उजाळा दिला. पक्षभेद विसरून गेल्या 40 वर्षांपासून आमचे उत्तम संबंध आहेत. राजकीय विचार वेगळे असले तरी ग्रामीण विकासाबाबतची त्यांची दृष्टी, नावीन्याचा शोध घेण्याची वृत्ती आणि ज्ञान संपादन करण्याची सवय यामुळे आमची मैत्री टिकून असल्याचे ते म्हणाले. 

शेती क्षेत्रापुढे काही समस्या आहेत. परंतु समस्यांचे समाधान शोधले पाहिजे, त्यादृष्टीने बारामतीत स्व. अप्पासाहेब व त्यानंतर राजेंद्र पवार व त्यांच्या टीमने काम केले असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले.  शरद पवार यांची दृष्टी यामागे असल्याचेही त्यांनी नमूद केले. शैक्षणिक संस्थांमध्ये चाललेले काम कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले. 

पुण्याच्या दोन दिवसीय दौर्‍यात बारामती पाहण्याचा योग पवार यांनी जुळवून आणला. त्यामुळे येथे शेती व शिक्षण क्षेत्रात झालेले काम पाहता आल्याचे उपराष्ट्रपती नायडू म्हणाले.