Thu, Aug 22, 2019 12:28होमपेज › Pune › बारामतीत बँकेच्या धमकीमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या

बारामतीत बँकेच्या धमकीमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या

Published On: Feb 01 2018 1:27AM | Last Updated: Feb 01 2018 1:27AMबारामती ः प्रतिनिधी

काटेवाडी (ता. बारामती) येथील महेश भानुदास कोळी (20) या महाविद्यालयीन तरुणाने घरात गळफास घेतला. बुधवारी दुपारी ही घटना घडली. माझ्या आत्महत्येला बँक कर्मचारी जबाबदार असल्याचा मजकूर हातावर लिहीत त्याने जीवन संपविले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत बारामती तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती. 

महेश हा त्याच्या आजीसोबत गावातील जिल्हा बँकेच्या शाखेत पैसे काढण्यासाठी मंगळवारी गेला होता. त्यावेळी पॅनकार्ड नसल्याने त्यांना थोडीच रक्कम देण्यात आली होती. त्यानंतर पॅनकार्डसह बुधवारी पुन्हा बँकेत गेले. या वेळी बँक कर्मचार्‍याकडून नजरचुकीने जादा पैसे दिल्याचा दावा करण्यात आला. तुमच्याकडे जादा रक्कम गेली असून ती परत करा, अन्यथा पोलिसांत तक्रार करू असे सांगण्यात आले. बँकेतून घरी आल्यावर महेश खोलीत गेला आणि त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने हातावर पेनने,  माझ्या मरणासाठी जबाबदार बँक कर्मचारी याच्यावर कारवाई करावी. आई, अण्णा, आक्का माफ करा, असा मजकूर लिहिला आहे.