Tue, Jul 23, 2019 02:14होमपेज › Pune › जानेवारी अखेरपर्यंत बोचरी थंडी कायम 

जानेवारी अखेरपर्यंत बोचरी थंडी कायम 

Published On: Dec 27 2017 2:22PM | Last Updated: Dec 27 2017 2:22PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

हवेचे दाब वाढल्‍यानंतर किमान तापमानात लक्षणीय घट होते. सध्या उत्तर भारतात हवेचे दाब चांगलेच वाढले असून, तेथून राज्याच्या दिशेने अतिथंड व कोरडे वारे थेट वाहत आहेत. त्याचबरोबर राज्यातील वातावरण निरभ्र आहे. यामुळे कमाल व किमान तापमानात घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात सध्या थंडीची लाट असून, जानेवारी अखेरपर्यंत या भागांमध्ये बोचरी थंडी कायम राहणार आहे. असा अंदाज ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी पुढारीशी ऑनलाईन बोलताना व्यक्त केला. 

जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार असून, रक्त गोठावणार्‍या थंडीचा अनुभव नागरिकांना घेता येणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागांतील किमान तापमान 6 अंशांपर्यंत खाली घसरू शकते. कोकण, मुंबईत मात्र अद्यापही बोचरी थंडी पडली नसून तिथे सरासरी 22 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. 

अरबी समुद्रातील पाण्याचे तापमान वाढले असून, पाणी उशिरा थंड होते. सध्या अरबी समुद्रातील पाण्याचे तापमान 23 अंश सेल्सिअस एवढे असून आद्रतेचे प्रमाण अधिक आहे. सह्याद्री पर्वत रांगेला हे आद्रतायुक्त वारे अडले जात आहे. यामुळे मुंबई, कोकणात थंडी पडली नसल्याचे निरीक्षण साबळे यांनी नोंदविले आहे.