Tue, Apr 23, 2019 06:10होमपेज › Pune › आमदार लांडगे यांच्याकडून विरोधकांना ‘धोबी पछाड’

आमदार लांडगे यांच्याकडून विरोधकांना ‘धोबी पछाड’

Published On: Aug 01 2018 1:33AM | Last Updated: Aug 01 2018 12:54AMपिंपरी : संजय शिंदे

भारतीय जनता पार्टीचे सहयोगी सदस्य आ. महेश लांडगे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वाढत चाललेली जवळीक भविष्यात अडचणीची ठरेल, या भावनेतून स्वपक्षासह विरोधी पक्षातील विरोधकांनी त्यांना घेरले होते. त्यातून पालिकेतील त्यांचे वर्चस्व कमी करण्याच्या हेतूने त्यांनी सूचवलेल्या प्रकल्पांना शह  देण्यात पक्षीय विरोधक यशस्वी झाले होते. महापौर निवडीत आ. लांडगे यांना चारीमुंड्या चित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते; परंतु कुस्तीत माहीर असणार्‍या आ. लांडगे यांनी  महापौरपदासाठी राहुल जाधव यांना आणून पक्षीय विरोधकांसह इतर पक्षातील विरोधकांना धोबी पछाड मारण्यात यश मिळविले; तसेच  शहराध्यक्षांच्या लॉबिंगला पक्षानेच दणका दिल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.

भाजपकडून महापौरपदासाठी भोसरी विधानसभा मतदारसंघातील राहुल जाधव आणि उपमहापौरपदासाठी चिंचवड मतदारसंघातील सचिन चिंचवडे यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. पालिकेतील मुख्य विरोधी पक्ष राष्ट्रवाडीकडून महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत उडी घेण्यात आली आहे. विनोद नेढे आणि विनया तापकीर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शनिवारी महापौर व उपमहापौरपदासाठी निवडणूक होणार की, तो फक्त फार्स राहणार हे पाहणे औचित्याचे ठरणार की, नाराज गटाकडून राष्ट्रवादीला बळ देण्यात येणार याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. नियमानुसार सत्ताधारी नगरसेवक व्हीप पाळणार का विरोधकांना मदत करणार यावर सर्व अवलंबून आहे; परंतु व्हीपच्या पुढे नगरसेवक जाणार नाहीत असा अंदाज असल्यामुळे राहुल जाधव यांची महापौर म्हणून निवड निश्चित असल्याचे बोलले जात आहे.

भोसरी मतदारसंघातील आ.लांडगे यांचे विरोधक त्यांना नेहमीच कात्रीत पकडण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामध्ये राष्ट्रवादी , शिवसेना हे आघाडीवर असतात. त्याबरोबर भाजपतीलच अंतर्गत राजकारणातून लांडगे यांना मात देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात त्यांना यश आल्याचे दिसते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या आठवड्यात चिंचवड आणि भोसरी मतदारसंघातील विकास कामांच्या उद्धघाटनासाठी शहरात आले होते; परंतु ऐनवेळी भोसरीतील उद्घाटन कार्यक्रम रद्द करण्यात आ.लांडगे यांचे विरोधक यशस्वी झाले होते.त्याची सल आ. लांडगे समर्थकांच्या चेहर्‍यावर दिसून येत होती. या आत्मविश्वासातून पक्षीय विरोधकांनी काही झाले तरी लांडगे समर्थकास महापौर होऊ द्यायचे नाही, यासाठी चंग बांधला होता; मात्र त्यात आ.लांडगे यांनी हाडाचा कुस्तीपट्टू असल्याचे पटवून देण्यात यश मिळविले आहे.