Tue, Apr 23, 2019 09:37होमपेज › Pune › मराठा आंदोलक पुण्यातील मुख्यमंत्र्यांचा दौरा उधळण्याच्या तयारीत?

मराठा आंदोलक पुण्यातील मुख्यमंत्र्यांचा दौरा उधळण्याच्या तयारीत?

Published On: Jul 23 2018 12:54PM | Last Updated: Jul 23 2018 12:54PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि चापेकर स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड मधील चापेकर वाड्याजवळ राष्ट्रीय संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या संग्रहालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (सोमवारी) होणार आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून मुख्यमंत्र्यांचा हा पुणे दौरा उधळून लावण्याची चर्चा असल्याने चिंचवड गाव आणि परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्‍यामुळे चिंचवड परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

चिंचवड गावातील चापेकर वाड्याजवळ संग्रहालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मागील काही दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाने आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री आज आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या पूजेसाठी पंढरपूरला जाणार होते. मात्र, मराठा क्रांती मोर्चाने पूजा करू न देण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पंढरपूरला न जाता आपल्या घरूनच विठ्ठलाची पूजा करणे पसंत केले.

त्यानंतर चापेकर संग्रहालयाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री येणार असल्याने मराठा क्रांती मोर्चा आणि विरोधकांच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज सकाळी निदर्शने केली. त्यानंतर पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक महत्वाच्या चौकांमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्‍त ठेवला आहे. चौकाचौकात नागरिकांऐवजी पोलिसांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शहराला एका छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.