Thu, Sep 20, 2018 05:58



होमपेज › Pune › २०० फूट दरीत कोसळूनही गिर्यारोहक बचावला

२०० फूट दरीत कोसळूनही गिर्यारोहक बचावला

Published On: Dec 30 2017 7:23PM | Last Updated: Dec 30 2017 7:20PM

बुकमार्क करा




जुन्नर : पुढारी ऑनलाईन  

नाणेघाट परिसरातील ऐतिहासिक किल्ले जीवधनजवळ असणार्‍या वानरलिंगी सुळक्यावरुन एक गिर्यारोहक २०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास  घडली. सकाळी सात वाजता दोन गिर्यारोहक वानरलिंगी सुळक्यावर गिर्यारोहणासाठी आले होते. त्यातील एक गिर्यारोहक २०० फूट खोल दरीत कोसळला. एका झाडाला अडकल्याने या गिर्यारोहकाचा जीव वाचला. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक मेजर रमेश खरमाळे यांच्या नेतृत्वाखाली बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत गिर्यारोहकाला जखमी अवस्थेत बाहेर काढले.
 

भोर तालुक्यातील करंदी येथून प्रणय सावंत (वय १७) आणि शरण सावंत (वय २२) हे दोन गिर्यारोहक सकाळी नाणेघाट येथील वानरलिंगी सुळक्यावर गिर्यारोहणासाठी आले होते. वानरलिंगी सुळका चढण्यास सुरुवात केल्यानंतर १५ फूट अंतरावर गेल्यावर शरण सावंत याच्या हाताला वेदना होऊ लागल्यामुळे त्याचा हात निसटला. तो वानरलिंगी सुळक्याच्या पश्‍चिमेला जवळपास २०० फूट खोल दरीत कोसळला. क्षणार्धात घडलेल्या या घटनेनंतर त्याच्या भावाने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर सुभाष आढारी यांनी तातडीने जुन्नर पोलीस स्टेशनला संपर्क साधला. 

या घटनेची माहिती मिळताच वनरक्षक मेजर रमेश खरमाळे त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे, वनरक्षक  रमेश खरमाळे, घाटघर येथील सुभाष आढारी, नितीन शिंदे, हनुमंत भाल, सॅम पाडळे, एलेक्स मेन्डोंसा, विलास रावते, विष्णू शिंदे, रोहिदास आढारी या बचाव पथकाने दोराचे स्ट्रेचर करून तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर  युवकाला वाचविले. त्यानंतर या गिर्यारोहकाला उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.