Tue, Mar 26, 2019 23:55होमपेज › Pune › सनातन संस्थेवर बंदीबाबत सरकारची भूमिका बोटचेपी : पृथ्वीराज चव्हाण 

सनातन संस्थेवर बंदीबाबत सरकारची भूमिका बोटचेपी : पृथ्वीराज चव्हाण 

Published On: Aug 20 2018 6:12PM | Last Updated: Aug 20 2018 6:07PMपुणे : प्रतिनिधी 

सनातन संस्थेवर बंदी आणावी, असा प्रस्ताव २०११ मध्येच केंद्राला पाठवला आहे. त्याबाबत वारंवार माहिती पुरविली आहे. मात्र राज्यात आणि केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर याबाबतच्या हालचाली थांबल्या आहेत. या संस्थेवर व संस्थेशी संबंधीत पोट संस्था, संघटनांवर देशव्यापी बंदी घालण्यासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकार बोटचेपी भूमिका घेत असल्याची टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. याप्रकरणी सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही यावेळी चव्हाण यांनी केली.

पुण्यातील कॉग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, गृह खात्याने दिलेल्या अहवालानुसार आम्ही केंद्राकडे सनातन संस्था व त्यांच्या पोट संस्था संघटनांवर देशव्यापी बंदी घलण्याचा प्रस्ताव केंद्राला दिला होत्या. त्यानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या. या सर्व हत्यांमागे सनातन संस्थेचा संबंध असल्याचे तपास यंत्रणा वारंवार सांगत आहे. यावरूनच आम्ही गृह खात्याने दिलेल्या अहवालास अनुसरून यासंस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली होती. आत्ता तर विविध हत्यांच्या तपासातून पुरावे हाती लागल्याचे सांगितले जात आहे. मग या संस्थेवर आणि तिच्या पोट संस्था, संघटनांवर बंदी का घातली जात नाही? असा प्रश्न उपस्थित करत चव्हाण यांनी दोन्ही सरकार याबाबत बोटचेपी भूमिका घेत असल्याचा आरोप केला. या संस्थेला सरकार व त्यांचे नेते पाठीशी घालत आहेत का ? असा प्रश्न निर्माण झाल्याचेही चव्हाण म्हणाले. 

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी नवनवीन नावे समोर येत आहेत. त्यामुळे या हत्येच्या मुळाशी सरकार जाईल का नाही, याबाबत शंका असून सरकारने ठोस पावले उचलून लवकरात लवकर न्यायालयात आरोपपत्र दाखल करावे आणि सनातन संस्थेच्या देशव्यापी बंदी संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही चव्हाण यांनी यावेळी केली.

याप्रसंगी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, युवक प्रदेशचे अध्यक्ष आमदार डॉ. विश्वजीत कदम, शहराध्यक्ष रमेश बागवे, जिल्हाध्यक्ष संजय जगताप उपस्थित होते.