Sun, Apr 21, 2019 03:51होमपेज › Pune › प्रेयसीसोबत लग्‍नासाठी पत्नीसह चिमुरड्याचा खून

प्रेयसीसोबत लग्‍नासाठी पत्नीसह चिमुरड्याचा खून

Published On: Jun 11 2018 1:25AM | Last Updated: Jun 11 2018 1:11AMवाकड : वार्ताहर

प्रेयसीसोबत लग्‍न करण्यासाठी पत्नीसह आठ महिन्यांच्या बाळाचा खून केल्याची धक्‍कादायक घटना शनिवारी रात्री हिंजवडी परिसरातील नेरे-जांबे रस्त्यालगत घडली. अश्‍विनी (27) व अनुज भोंडवे (8 महिने) अशी खून झालेल्या माय-लेकरांची नावे आहेत. या हत्येप्रकरणी अश्‍विनीचा पती दत्ता वसंत भोंडवे (30, रा. दारुंब्रे, ता. मावळ) याला यांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. या कटात सहभागी प्रेयसी सोनाली बाळासाहेब जावळे (24, रा. आदर्श कॉलनी, वाकड) व त्यांचे दोन साथीदार प्रशांत जगन भोर (25, रा. माण, ता. मुळशी), पवन नारायण जाधव (21, रा. हिंजवडी)  यांनाही अटक केली आहे. सुरुवातीला पतीने लुटमारीचा बनाव केला.  मात्र चौकशीत दत्ता देत असलेली माहिती पोलिसांना संशयास्पद वाटू लागली. 

पोलिसांनी दत्ताकडेच उलट तपासणी सुरू केली. पोलिसी खाक्यासमोर दत्ता फार काळ टिकू शकला नाही. त्याने आपणच प्रेयसी व अन्य तीन साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  2014 साली दत्ताचा घरच्यांच्या संमतीने अश्विनीशी प्रेमविवाह झाला होता. त्यांना तीन वर्षाची अनुष्का व आठ महिन्यांचा अनुज अशी दोन मुले आहेत. त्यांचा संसार सुरळीत सुरू होता. अश्विनीला कशाचीही कमी नव्हती व तिच्या आयुष्यात ती सुखी होती.  तिने कधीही माहेरी तक्रार केली नसल्याचे तिचे नातेवाईक सांगतात. सर्व काही आलबेल असताना आठ दिवसांपूर्वीच अश्विनी तिच्या दोन्ही मुलांना घेऊन माहेरी डांगे चौकात गेली होती. शनिवारी (दि. 9) रात्री आठच्या सुमारास दत्ता अश्विनीला नेण्यास डांगे चौकात आला होता.

अश्विनीचे आई-वडील अनुष्काला घेऊन त्यांच्या दुसर्‍या मुलीकडे नोघोजे येथे गेले होते.  त्यामुळे अश्विनी आणि अनुजला घेऊन दत्ता दारुंब्रेच्या दिशेने निघाला. पूर्वनियोजित कटानुसार पुनावळे येथे गेल्यावर दत्ताने उलट्यांचे नाटक करीत गाडी थांबवली. तो चूळ भरण्यासाठी खाली उतरला असता प्रशांत भोर आणि पवन जाधव दोघे जण त्याच्या कारमध्ये येऊन बसले व त्यांनी दत्ताला चाकूचा धाक दाखवून कार नेरे-जांबे रस्त्यावर नेण्यास सांगितले. दत्ताने कार नेरे-जांबे रस्त्यावरील निर्मनुष्य ठिकाणी आणली. त्या ठिकाणी आरोपींनी  दोरीने गळा आवळून अश्विनी व अनुजचा खून केला.  या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली. पोलिस खात्यातील अतिवरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे गांभीर्याने पाहत तपासाबाबत सूचना केल्या.

पोलिस तपासात दत्ताचे वाकड येथील सोनाली जावळे या मुलीशी प्रेमसंबंध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. तिला ताब्यात घेतले असता दोघांनी  मिळून प्रशांत भोर आणि पवन जाधव यांना 2 लाखांची सुपारी दिल्याचा खुलासा झाला. या 2 लाखांपैकी 50 हजार देण्यात आले होते, तर बाकीचे दीड लाख काम झाल्यानंतर देण्याचे ठरले होते. अश्विनी व मुलगा अनुजचा अडसर दूर झाल्यानंतरच तुझ्याशी लग्न करता येईल, असे दत्ताने प्रेयसीला सांगितले होते. त्यामुळे या दोघांनी मिळून हा प्लॅन केला. अश्विनी हिंजवडीतील एका शाळेत लिपिक म्हणून कार्यरत होती. अडीच वर्षांपूर्वी दत्ता आणि सोनाली यांची मैत्री फेसबुकवर झाली होती. पोलिस तपासात दत्ताचे अनेक मुलींशी प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले आहे. त्याने दुसर्‍या एका मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचा साखरपुडा मोडण्यास भाग पाडले होते. तसेच त्याच्या मोबाईलच्या तपशिलावरून तो वेगवेगळ्या मुलींच्या संपर्कात असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण वायकर यांनी सांगितले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत हिंजवडी, वाकड तसेच गुन्हे शाखेची टीम समांतर तपासकाम करीत होत्या. गुन्हा घडल्यानंतर 12 तासांच्या आतच गुन्ह्याचा छडा लावीत आरोपींना जेरबंद केले.

...म्हणून अनुष्का वाचली

दत्ता अश्‍विनीला घेण्यास आला, तेव्हा अनुष्का आजी- आजोबांसोबत निघोजे येथील मावशीकडे गेली होती. अनुष्काला आजी-आजोबांनी सोबत नेले नसते, तर क्रूरकर्मा दत्ताने तिलाही मारण्यास मागे-पुढे पाहिले नसते, अशी भावना अनुष्काच्या मामांनी व्यक्‍त केली.