Thu, Jun 27, 2019 09:37होमपेज › Pune › पुणे : मुख्यमंत्री सोडवणार मेट्रो डेपोचा तिढा

पुणे : मुख्यमंत्री सोडवणार मेट्रो डेपोचा तिढा

Published On: Feb 03 2018 2:16AM | Last Updated: Feb 03 2018 1:25AMपुणे : प्रतिनिधी 

अनेक दिवसांपासून अधांतरी असलेला कोथरुड येथील कचरा डेपोच्या जागेवरील प्रस्तावित मेट्रो डेपो व शिवसृष्टीचा प्रश्‍न सोडवण्यासाठी पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे, अशी माहिती पुणे मेट्रोच्या वनाज ते रामवाडी या मार्गिका क्रमांक दोनचे मुख्य प्रकल्पाधिकारी गौतम बिर्‍हाडे यांनी शुक्रवारी दिली. 

राज्यशासनाकडून हा निर्णय घेण्याबाबत दिरंगाई केली जात असल्याने याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करत मेट्रोचे काम बंद पाडण्याचा इशारा माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्यासह महापालिकेतील विरोधीपक्षांनी घेतला आहे. त्यामुळे एका बाजूला काम सुरू झालेले असताना, दुसर्‍या बाजूला हा तिढा न सोडविला गेल्यास अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. त्याची अंतिम तारीख अजून निश्‍चित नसल्याचेही बिर्‍हाडे यांनी सांगितले आहे. मेट्रो डेपो हा मेट्रोच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग असून त्याचा निर्णय लवकर होणे महत्त्वाचे आहे, असेही बिर्‍हाडे यांनी यावेळी सांगितले आहे. 

पुणे मेट्रोच्या वनाज ते रामवाडी या मार्गावरील मेट्रो डेपो कोथरूड कचरा डेपोच्या ठिकाणी प्रस्तावित आहे. त्याच ठिकाणी महापालिकेने शिवसृष्टीही प्रस्तावित केली असून त्यासाठी माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी पुढाकार घेतला असून जमिनीखाली मेट्रो स्टेशन तर जमिनीवर शिवसृष्टी करावी, अशी शिवप्रेमींची मागणी आहे. 

मात्र, या जागेवर तांत्रिकदृष्ट्या मेट्रो डेपो जमिनीखाली नसल्याने महामेट्रोने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवसृष्टीसाठी बीडीपीमधील जागा देण्याचे आश्‍वासन यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका पदाधिकार्‍यांना दिलेले होते.मात्र, त्याबाबतचा अंतिम निर्णय अजूनही झालेला नाही. त्यामुळे हा निर्णय तातडीने न घेतल्यास हे काम बंद पाडण्याचा इशारा मागील आठवड्यात झालेल्या मुख्यसभेत मानकर यांच्यासह विरोधीपक्षांच्या सदस्यांनी दिला आहे. तर महापौरांनीही या सभेत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तातडीने निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिलेले आहे. याबाबत बिर्‍हाडे म्हणाले, राज्यशासनाकडे याबाबत पुढील आठवडयात बैठक होणार आहे. मात्र, नेमकी कोणत्या दिवशी ही बैठक होणार हे निश्‍चित नाही. तसेच या बैठकीसाठी आवश्यक तयारीही महामेट्रोने केली आहे.