Tue, Jul 23, 2019 12:28होमपेज › Pune › पुण्यात राजकीय समीकरण बदलण्याचे संकेत?

पुण्यात राजकीय समीकरण बदलण्याचे संकेत?

Published On: Dec 07 2018 9:06PM | Last Updated: Dec 07 2018 9:06PM
पुणे : दिगंबर दराडे

भारतीय जनता पार्टीकडून धक धक गर्ल माधुरी दीक्षीत यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली आणि राष्ट्रवादीकडून लोकसभेला जागा सोडण्याची वारंवार होत असलेली मागणी यामुळे पुण्यातील राजकीय समीकरण बदलण्याचे संकेत दिसत आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुण्यात दि ९ डिसेंबर रोजी शिबीराचे आयेाजन करण्यात आले आहे. या शिबीराला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. या चिंतन शिबिराकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यापूर्वीच आघाडीचा धर्म पाळण्याच्या सूचना करणारे पुण्याच्या लोकसभेच्या जागेविषयी नेमकी काय भूमिका मांडणार असाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. तर भारतीय जनता पार्टीकडून अनिल शिरोळे यांच्यासह अनेक नेते बाशिंग बांधून तयार झाले आहेत.  यामुळे येत्या निवडणुकीत पुण्याची समीकरणे निश्‍चितपणे बदलणार आहेत.  पुणे लोकसभा मतदारसंघासह, बारामती, शिरुर आणि मावळ मतदारसंघातही आदलाबादलाचे वारे वाहणार असल्याची माहिती राजकीय नेत्यांनी पुढारी बरोबर बोलताना व्यक्त केली. 

काँग्रेस राष्ट्रवादीच्या मनोमिलनानंतर पुण्यातच प्रामुख्याने जागा बदलाचे पेव फुटणार आहे. राष्ट्रवादीलाही आपली ताकद अजमावण्यासाठी एक संधी हवी आहे.  माधुरी दीक्षीतच्या नावामुळे भाजप नवीन चेहर्‍याला संधी देणार? असा ही या निमित्ताने प्रश्‍न निर्माण झाला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात नवीन इनिंग सुरु करण्यासाठी सुप्रिया सुळे सज्ज झाल्या आहेत. त्‍यांनी मागील दीडवर्षात कार्यकर्त्यांच्या गाठीभेटींवर अधिक भर असल्याचे दिसून येत आहे.  प्रामुख्याने शहराच्या वेगवेगळ्या स्तरांवरील राजकारणात जुन्या दिग्गजांना धक्का देऊन नव्या पिढीचा उदय होत असल्याची चाहूल सध्या लागली आहे. केंद्रीय पातळीवर काँग्रेसने पुन्हा डिझॅस्टर मॅनेजमेंटसाठी कंबर कसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे राजकारण आणि विकासाच्या प्रश्नात जातीने लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. ही भाजपच्या जमेची बाजू आहे. येत्या काळात अनेक विकासाच्या प्रकल्पाची उद्घाटन होणार आहेत. त्याची तयारी करण्याच्या सूचनाही अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. 

...निवडणूक तयारीवर चर्चा अपेक्षित 
‘राष्ट्रवादीचे पुण्यात दि. ९ डिसेंबर रोजी लक्ष्मी लॉन्स येथे चिंतन शिबीर होत आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर या चिंतनात चर्चा होणार आहे. भ्रष्टाचाराचे आरोप, भाजप, शिवसेना हे विषय चर्चेला येणार आहेत. याच बरोबर संघटन, राज्यातील मूलभूत प्रश्‍नायावर चिंतन केले जाणार असून, निवडणूकीची तयारी म्हणून देखील राष्ट्रवादीच्या शिबीराकडे पाहिले जात आहे. अनेक नेत्यांचे अद्याप तळ्यात मळ्यात सुरु आहे. लोकसभेच्या निवडणुका अवघ्या पाच महिन्यांवर आल्या आहेत. यामुळे आता राजकीय वारे वाहू लागले आहे. काही दिवसांमध्ये नेत्यांनेत्यांमध्ये आरोपाच्या तोफा डागल्या जाणार आहेत.