नियोजनातील बदलाचा संघाला फायदाच

Last Updated: Oct 10 2019 1:40AM
Responsive image


पुणे ः प्रतिनिधी

भारतीय संघ व्यवस्थापनाने कसोटी सामन्यांसाठी अनेकदा नियोजनात केलेल्या बदलाचा निकाल आता दिसत आहे. आम्ही दोन वर्षांपासून जे बदल करीत आहोत. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत आम्ही खूप कमी सामन्यांमध्ये पराभूत झालो आहोत. संघात लवचिकता असल्याचे प्रतिपादन भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार कोहलीने व्यक्त केले.

दक्षिण आफ्रिकेविरोधात भारताचा दुसरा कसोटी सामना गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर गुरुवार दि. 10 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांनी आज मैदानावर सराव केला. त्यावेळी पत्रकार परिषदेमध्ये तो बोलत होता. कोहली पुढे म्हणाला की, ‘मोहम्मद शमीचे सपाट आणि निर्जीव खेळपट्टीवरही चेंडू स्विंग करण्याच्या कलेमुळे तो खास आहे. प्रतिकूल परिस्थितीतही सामना फिरवण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. दुसर्‍या डावात कठीण परिस्थितीतही तो आपली कामगिरी चोखपणे पार पाडतो. अशा शब्दांत त्यानं शमीचं कौतुक केलं. 

रोहित शर्माबाबत बोलताना तो म्हणाला की, काही काळासाठी रोहितला एकटं सोडणे आवश्यक आहे. तुम्हाला माहीत आहे, तो चांगला खेळत आहे. त्याला आपल्या फलंदाजीचा आनंद घेऊ द्या. तो कसा खेळणार आहे, याकडे लक्ष देणे बंद करावे. तसेच, कुलदीप यादवच्या बाबतीत म्हणाल तर अंतिम अकरामध्ये त्याला का स्थान मिळाले नाही यामागील कारण त्याला ठाऊक आहे. येथे कुणीही स्वत:चा विचार करीत नाही. प्रत्येक जण संघासाठी काय करता येईल याचा विचार करीत असतो. कुलदीपबाबतही हेच म्हणावं लागेल. अश्विन आणि जडेजा यांना संघ व्यवस्थापनाची पहिली पसंती आहे.