होमपेज › Pune › भारतातच सर्वाधिक सिझेरियन प्रसूती : प्रकाश जावडेकर 

भारतातच सर्वाधिक सिझेरियन प्रसूती : प्रकाश जावडेकर 

Published On: Jun 16 2018 12:40PM | Last Updated: Jun 16 2018 12:40PMपुणे : प्रतिनिधी

इतर देशांच्या तुलनेत भारतातील खासगी रुग्णालयांमध्ये सर्वाधिक सिझेरिअन प्रसूती का केल्या जातात? असा परखड सवाल उपस्थित डॉक्टरांना विचारत केंद्रीय मनुष्यबळ मंत्री व खासदार प्रकाश जावडेकर यांनी वैद्यकीय व्यवसायाच्या अप प्रवृत्तींवर नेमके बोट ठेवले. भारताईतके इतर कुठल्याच देशांत सिझेरियनचे इतके प्रमाण नाही, असे म्हणत वैद्यकिय व्यवसायांतील अपप्रवृत्‍तींवर त्यांनी हल्‍ला चढवला.  

लॅप्रोस्कोपिक बेरियाट्रिक सर्जन डॉ. शशांक शहा यांनी पुण्यातील जे. डब्लू. मेरिअट हॉटेल येथे आयोजित केलेल्या ‘बेस्ट मेटासर्ज’ या वैद्यकीय परिषदेचे उद्घाटन खा. जावडेकर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.  

भारतात एकूण प्रसूतींपैकी 60 टक्कयापर्यंत प्रसूती सिझेरिअन होतात. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्यामध्ये हे प्रमाण अधिक आहे. प्रसूतींसाठी खासगी रुग्णालयांकडून एक लाख रुपयांपर्यंत दर आकारला जातो, असे निदर्शनास आणून दिले. केंद्र शासनाने अँजिओप्लास्टीसाठी लागणार्‍या स्टेंटच्या किमती नियंत्रित केल्या. त्यामुळे रुग्णालयांनी स्टेंट च्या किमती कमी केल्या, पण त्याचा तोटा भरून काढण्यासाठी अँजिओप्लास्टीसाठी लागणार्‍या इतर प्रोसीजरच्या किंमती वाढवल्याचे त्यांनी उपस्थित डॉक्टरांच्या लक्षात आणून दिले. स्टेम सेलसाठी अवघा 36 हजार रुपये खर्च होतो. त्यासाठी दोन लाख रुपये का घेतले जातात, असा प्रश्‍नही त्यांनी यावेळी विचारला. 

मी आणिबाणीच्या काळात जेलमध्ये असताना औंध येथील डॉक्टरांनी माझी हृदयाची शस्त्रक्रिया केली होती. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले होते, की मला 65 व्या वर्षी पेसमेकर बसवावा लागेल. तसा मी आता पेसमेकर बसवून घेतलाआहे. डॉक्टरांचे वैद्यकिय ज्ञान असे परफेक्ट असावे, असे त्यांनी सांगितले.

डॉक्टर आणि पत्रकार हे समाजासाठी काम करतात. त्यांच्यावर होणारे हल्ले थांबायला हवेत असे ते म्हणाले. तसेच डॉक्टरांवर हल्‍ले होउ नयेत म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नडडा यांना निवेदन देणार असल्याचेही जावडेकर यांनी यावेळी सांगितले.

स माझ्या मुलाला पोटाचा त्रास असल्याने तो मुंबईतील एका नामांकित डॉक्टरकडे गेला. त्या डॉक्टरने त्याला केवळ ‘पॅन डी’ ही अ‍ॅसिडीटी कमी करणारी गोळी दिली व त्या बदल्यात दोन हजार रूपये फी घेतली. डॉक्टरांनी त्यांच्या कौशल्याचे पैसे घ्यायला हवेतच. पण, त्यामध्ये फार तफावत असू नये असेही जावडेकर यांनी यावेळी सांगितले.