Mon, Mar 25, 2019 09:09होमपेज › Pune › १५ जानेवारीपासून घरबसल्या दाखले

१५ जानेवारीपासून घरबसल्या दाखले

Published On: Dec 25 2017 1:19AM | Last Updated: Dec 25 2017 12:31AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

जिल्ह्यातील गावोगावच्या ग्रामपंचायतींद्वारे करण्यात येणार्‍या नोंदी आणि दाखल्यांचा वेग वाढविण्यासाठी 796 केंद्रांमध्ये अद्ययावत सॉफ्टवेअर उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या 15 जानेवारीपासून नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ऑनलाइन दाखले मिळण्यासाठी ‘ई-ग्राम’ हे अद्ययावत सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्यात आले आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला सॉफ्टवेअरचा शुभारंभ होणार आहे. 15 जानेवारीपर्यंत संपूर्ण पुणे जिल्ह्यात हे सॉफ्टवेअर सुरू होणार आहे.

राज्यातील 28 हजार 728 ग्रामपंचायतींमध्ये ई-ग्राम सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्याची योजना सध्या सुरू आहे. यापूर्वी ई-दाखले देण्यासाठी संग्राम नावाचे सॉफ्टवेअर कार्यान्वित कार्यरत होते. मात्र, त्या सॉफ्टवेअरमुळे 28 प्रकारचे दाखले उपलब्ध होत होते. दरम्यान, नागरिकांना विविध दाखले देण्यासाठी ‘ई-ग्राम’ सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यामुळे 33 प्रकारचे दाखले नागरिकांना घरबसल्या मिळणार आहेत. जिल्ह्यात 1 हजार 407 ग्रामपंचायती आहेत. 15 जानेवारीपर्यंत बहुतांश ग्रामपंचायतींमधील कामकाजाच्या नोंदी ऑनलाइन करण्यासाठी जिल्ह्यातील केंद्रांवर ई-ग्राम सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे. ई-ग्राम सेवाद्वारे ऑनलाइन दाखले देण्यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह अन्य जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू झाली आहे. 

जिल्ह्यातील 796 केंद्रांमध्ये हे सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे अल्पावधीतच जिल्ह्यातील नागरिकांना 33 प्रकारचे दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ऑनलाइन यंत्रणेमुळे दाखला घेण्यासाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत. ऑनलाइन दाखल्यांची प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत असल्यामुळे नागरिकांना या सॉफ्टवेअरचा नक्कीचा फायदा होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात सॉफ्टवेअर 100 टक्के कार्यान्वित करण्यात आले आहे. नववर्षाच्या सुरवातीला हे सॉफ्टवेअर प्रत्यक्ष नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज असणार आहे, अशी माहिती ‘आपले सरकार’ सेवा केंद्राच्या समन्वयकांनी दिली आहे. 

33 प्रकारचे दाखले मिळणार

जिल्ह्यात ई-ग्राम सॉफ्टवेअरचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे जानेवारी 2018 पासून 13 तालुक्यांतील नागरिकांसाठी सॉफ्टवेअरचा फायदा होणार आहे. ई-ग्राम सॉफ्टवेअरमुळे नागरिकांना 33 प्रकारचे दाखले मिळणार आहेत.  - संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी