Thu, Jul 18, 2019 06:06होमपेज › Pune › केरळमधील पूरग्रस्तांसाठी विद्यापीठाची केंद्रीय यंत्रणा

केरळमधील पूरग्रस्तांसाठी विद्यापीठाची केंद्रीय यंत्रणा

Published On: Aug 22 2018 1:23AM | Last Updated: Aug 22 2018 1:23AMपुणे : प्रतिनिधी  

केरळमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विद्यापीठाने केंद्रीय यंत्रणा उभी करण्याचा निर्णय घेतला असून, प्रत्यक्ष पुनर्वसनाच्या कामात संलग्न महाविद्यालयांनी विविध माध्यमातून सक्रियरित्या सहभागी होण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे. 

विद्यापीठाने याबाबतचे परिपत्रक महाविद्यालये आणि संलग्न संस्थांना पाठवले आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या समितीच्या माध्यमातून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संररचनात्मक आराखडा तयार केला जात आहे. त्यानुसार पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतून विविध वस्तूंचे संकलन तसेच निधी संकलन करून कुलगुरू निधी निर्माण केला जाणार आहे. तसेच पुढील दोन महिन्यांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळाच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून केरळमध्ये प्रत्यक्ष पुनर्वसन कार्यात सहभागी होण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

हवाबंद खाद्यपदार्थ, कपडे, प्लंबिंग आणि इलेक्ट्रिक साहित्य आदी वस्तू संकलित करून विद्यापीठाच्या केंद्रीय यंत्रणेकडे जमा कराव्यात, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, नागरिकांकडून रोख आणि ऑनलाईन पद्धतीने निधी संकलन करावे, तसेच केरळमधील पुनर्वसन कार्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांना केले आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी जमा

केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी जमा करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इतिहास विभागाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी गेले तीन दिवस शहराच्या विविध सिग्नलवर नागरिकांना आवाहन करून तब्बल 1 लाख 1 हजार 800 रुपयांचा निधी गोळा केला. हा निधी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला असून, तो कुलगुरू विशेष निधीतून केरळच्या मदतग्रस्तांसाठी हस्तांतरित करण्यात येणार आहे.

विद्यापीठाच्या इतिहास विभागातील 28 विद्यार्थी आणि 13 विद्यार्थिनींनी मिळून ही रक्कम जमा करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी 18 ते 20 ऑगस्ट या काळात विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील सिग्नल तसेच, डेक्कन, दगडूशेठ गणपती, खडकी स्टेशन, शिवाजीनगर येथे नागरिकांना आवाहन करून निधीचे संकलन केले. त्यातून तब्बल 1 लाख 1,800 रुपयांचा निधी जमा झाला. हा निधी इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ. राधिका सेशन यांच्या हस्ते कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे विशेष निधीसाठी सुपूर्द करण्यात आला. या वेळी विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच, प्राध्यापक डॉ. श्रद्धा कुंभोजकर आणि प्रा. बाबासाहेब दूधभाते उपस्थित होते. कुलगुरू डॉ. करमळकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

नगरसेवकांचा वॉर्डस्तरीय निधी

केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महापालिकेच्या प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डस्तरीय निधीतून प्रत्येकी 1 लाख रुपयांचा निधी देण्याचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे. त्यावर समितीच्या पुढील बैठकीत निर्णय होणार आहे.

महापालिकेचे सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आणि उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी हा प्रस्ताव दिला आहे. केरळ राज्यात पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे लाखो नागरिक बेघर झाले असून शेकडोंचा मृत्यू झाला आहे. या नागरिकांच्या मदतीसाठी जगभरातून केरळला मदतीचा ओघ सुरू आहे. 

त्यामुळे आता पुणे महापालिकेने केरळला मदत करण्यासाठी पाऊल उचलले आहे. त्यानुसार नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधीतून मदत करण्याचा आणि त्यासाठी सर्व सदस्यांना विनंती करण्याचा प्रस्ताव आला आहे. 

केरळ पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन

केरळमध्ये पावसाच्या हाहाकारानंतर पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान देशभरातून येथील पूरग्रस्तांना मदत दिली जात आहे. पुण्यातील पोलिस अधिकार्‍यांनीही केरळ पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केले आहे. त्याला सर्वच अधिकार्‍यांनी प्रतिसाद दिला. 

मंगळवारी आठवड्याची गुन्हेगारी आढावा बैठक पार पडली. त्यावेळी पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी हे आवाहन केले आहे. यासाठी पुणे पोलिस एक स्वतंत्र खाते उघडून त्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे. पैसे केरळ पोलिसांमार्फत तेथील पूरग्रस्ताच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे. 

आपत्तीग्रस्तांना सौर दिव्यांची मदत

केरळ राज्यात आलेल्या महापुरामुळे जनजीवन उद्ध्वस्त झाले असून शहरे व खेडी या प्रलयंकारी महापुरामुळे उजाड झाली आहेत. त्यामुळे राज्यातील नागरिकांना अन्न, वस्त्र, औषधे या वस्तूंची तातडीने मदत करणे आवश्यक आहे. महापुरामुळे दुर्गम भागातील विद्युत पुरवठाही खंडित झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीचे गांभीर्य ओळखून पुणेस्थित सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्या वतीने केरळ राज्यातील अ‍ॅलेप्पी जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांसाठी 700 सोलर एल.ई.डी. दिवे सोमवारी (दि. 20) मदत म्हणून पाठविले.  

जीवनावश्यक वस्तू रवाना

केरळवासीयांना मदतीचा हात द्यावा याकरिता पुण्यातील युनायटेड नर्सेस असोसिएशनच्या वतीने जीवनावश्यक वस्तू केरळला पाठविण्यात आल्या आहेत. हे साहित्य सोमवारी रात्री 16381 मुंबई-कन्याकुमारी एक्स्प्रेसमधून पाठविण्यात आल्याची माहिती  रेल्वे प्रशासनाने दिली. या साहित्यामध्ये औषधे, कपडे, खाद्यपदार्थ आदींचा समावेश आहे. तब्बल 375 पेकेट्स (फ्लड रिलीफ मटेरियल) पाठविण्यात आली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी रेल्वेने रिकामा रेक पाठवून दक्षिण रेल्वेला मदत केली होती.