Tue, Apr 23, 2019 10:18होमपेज › Pune › पुण्यात कार अपघातात दोघे ठार, २ जखमी

पुण्यात कार अपघातात दोघे ठार, २ जखमी

Published On: Mar 04 2018 2:35PM | Last Updated: Mar 04 2018 2:35PMमंचर : प्रतिनिधी

पुण्याहून नाशिकडे जाणार्‍या कारला आंबेगाव तालुक्यातील भोरवाडी-अवसरी खुर्द येथे पुणे-नाशिक हमरस्त्यावर अपघात झाला. यात कारमधील दोघेजण जागीच ठार तर दोघेजण जखमी झाले आहेत. रविवारी पहाटे ५ वाजून १५ मिनिटांनी हा अपघात झाला. अपघातात द्राक्ष बागायतदार रमेश नामदेव सोनवणे आणि पोलिस कर्मचारी बबन निवृत्ती तिडके रा. दोघेही नाशिक यांचा मृत्यू झाला.

पुणे येथील कामे उरकून आय २० कार क्रमांक एमएच १५ ५१५१ मधून रमेश नामदेव सोनवणे (वय ५८) राहणार खेडगांव ता.दिंडोरी, बबन निवृत्ती तिडके (वय ५२) राहणार कसबे सुकाणे ता. निफाड, निवृत्ती बाबुराव काश्मिरे (वय ५४) रा. सातपूर नाशिक, ज्ञानेश्वर कुंडलिक वाघ (वय ५२) रा. आंबेजानोरी ता. दिंडोरी हे सर्व नाशिककडे जात होते. पुणे-नाशिक हमरस्त्यावर तांबडेमळा-भोरवाडी येथे आय २० कार आली असता रस्‍त्यावर कुत्रे आडवे आले. त्याला वाचवण्याच्या प्रयत्‍नात गाडी चालक रमेश सोनवणे यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी रस्त्यालगतचा डिव्हाईडर आणि लोखंडी बोर्ड तोडून बाजूच्या खड्‍ड्यात उडून कोसळली. यावेळी गाडी एका झाडाला अडकली. 

दरम्यान, अपघातच्या वेळी मोठा आवाज झाल्याने स्थानिक ग्रामस्थ तसेच शिवनेरी येथून शिवज्योत घेवून जाणारे शिवप्रेमी यांनी मोबाईलच्याप्रकाशात गाडीत अडकलेल्या चौघांना कसेबसे बाहेर काढले. जखमींना मंचर उपजिल्हा रूग्णालयात नेले असता अपघातातील रमेश सोनवणे, बबन तिडके यांचे वैद्यकीय तपासणीपूर्वीच निधन झाले. निवृत्ती काश्मिरे आणि ज्ञानेश्वर वाघ यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले.

मृत रमेश सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. पोलिस कर्मचारी बबन तिडके यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. रमेश आणि बबन यांच्या मृतदेहाचे मंचर उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करून दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या अपघाताची फिर्याद ज्ञानेश्वर वाघ यांनी मंचर पोलिस ठाण्याला दिली आहे.