Sun, Apr 21, 2019 02:33होमपेज › Pune › प्लास्टिक बंदी विरोधात व्यापाऱ्यांचे मनपासमोर आंदोलन(व्हिडिओ) 

प्लास्टिक बंदी विरोधात व्यापाऱ्यांचे मनपासमोर आंदोलन(व्हिडिओ) 

Published On: Jun 25 2018 12:50PM | Last Updated: Jun 25 2018 12:50PMपुणे : प्रतिनिधी

राज्य शासनाने राज्यात संपूर्ण प्लास्टिक बंदी केली मात्र कोणत्याही प्रकारचा सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला नाही. या बंदीच्या अनुशंगाने महापालिकेने हाती घेतलेली कारवाईची मोहीम चुकीची आणि अन्यायकारक आहे. या माध्यमातून पालिका अधिकाऱ्यांच्या हातात आयते कोलित मिळाले आहे. असा आरोप करत शहरातील व्यापाऱ्यांनी प्रथम सक्षम पर्याय द्या, मगच कारवाई करा. अन्यथा बेमुदत संप पुकारला जाईल, असा इशारा दिला आहे.

राज्य शासनाने संपूर्ण प्लास्‍टिक बंदीची घोषणा केल्यानंतर जनजागृतीसाठी आणि जवळ असलेल्या प्लास्‍टिकची विल्हेवाट लावण्यासाठी दिलेली मुदत संपल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शनिवारी दिवसभर शहरात धडक कारवाईची मोहीम हाती घेतली. प्लास्टिक बाळगणाऱ्यांना पाच हजार रुपये दंड आकारला जात आहे. ही कारवाई आणखी तिव्र केली जाणार असल्याचे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने सांगितले आहे. 

या कारवाई विरोधात शहरातील लहान मोठे व्यवसायिक आणि व्यापाऱ्यांच्या वतीने महापालिका गेटवर तिव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कापड, किराणा, खाद्य पदार्थ विक्रेते यांच्यासह विविध व्यवसायिक सहभागी झाले आहेत. आम्ही प्लास्टिक बंदीच्या विरोधात नाही. शासनाने बंदी करावी, मात्र त्याआधी सक्षम पर्याय द्यावा, आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत अशी भूमिका यावेळी व्यापाऱ्यांनी मांडली.